गोंडवाना विद्यापीठाच्या “विद्यापीठ आपल्या गावात” उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन

विद्यार्थ्यांना मिळणार आत्मनिर्भर, स्वावलंबी व कौशल्यावर आधारीत रोजगाराभिमुख शिक्षण – अधिष्ठाता डॉ चंद्रमौली

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच गाव विकासात हातभार

निमणी (ता कोरपना) येथे बीए पदवी अभ्यासक्राचा शुभारंभ

24 विद्यार्थ्यांनी घेतला अभ्यासक्रमास प्रवेश

गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक व संशोधनाला चालना देणारे असून यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत सुरू केलेला “विद्यापीठ आपल्या गावात” हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत आत्मनिर्भर, स्वावलंबी व कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच गावाच्या विकासात मोलाचा हातभार लागेल, असे प्रतिपादन मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य (प्र) डॉ आमुदाला चंद्रमौली यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ, ग्रामपंचायत निमणी व महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामपंचायत निमणी येथे “विद्यापीठ आपल्या गावात” उपक्रमातंर्गत बी ए पदवी अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आदर्श पदवी महाविद्यालयाचे सल्लागार समिती सदस्य डॉ संजय गोरे, ग्रामपंचायत निमणीचे सरपंच अतुल धोटे, उपसरपंच शिल्पा जगताप, शिवाजी महाविद्यालय राजुराचे माजी प्राचार्य दौलतराव घोंगडे, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सचे सहायक प्राध्यापक अजितकुमार शर्मा, शरदराव पवार महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आशिष दरेकर, निमणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक झाडे, जि प उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भोंगळे तसेच आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर आदी उपस्थित होते.

डॉ चंद्रमौली म्हणाले, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून चांगले सहकार्य गावातील नागरिक तथा इतरांकडून मिळत आहे. निमणी गावातील 24 विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमामुळे अपुर्ण पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. तसेच या उपक्रमात महिला वर्गाची उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने गृह व कौटुंबिक अर्थशास्त्र यासारखे विषय समाविष्ट करण्यात आले आहे. गाव केंद्रबिंदू मानून लोकांनी काम करावे, असे आवाहन डॉ चंद्रमौली यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ शैलेंद्र देव यांनी, आईची उपमा देत शिक्षणाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले. या उपक्रमासाठी महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर आपल्या गावासोबत काम करणार आहे. प्राध्यापक आपल्या गावात रात्रकालीन शिक्षण देणार असून गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील डॉ देव यांनी केले.

मार्गदर्शन करतांना डॉ संजय गोरे म्हणाले, आत्मनिर्भरतेपासून आधुनिकतेकडे निरंतर वाटचाल करण्याची भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत ग्रामीण व आदिवासी गावांमध्ये सदर उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सोबतच निमणी गावाची संकल्पना, गावासोबत असलेले सहसंबंध आणि विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाची सविस्तर माहिती डॉ संजय गोरे यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितली. प्राध्यापक आशिष दरेकर यांनी विद्यापीठ आपल्या गावात ग्रामपंचायत बिबी येथे चालू असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल कोरडे, संचालन उमेश राजूरकर यांनी तर आभार प्रदर्शन समन्वयक भरत घेर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page