नागपूर विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचारधारा विभागात गांधी जयंती सप्ताहाचे उदघाटन
महात्मा गांधींच्या समांतर संस्कृतीतून लोकशाही मूल्ये – सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांचे प्रतिपादन
नागपूर : महात्मा गांधी यांनी सर्जनशील विचार असलेली समांतर संस्कृती निर्माण करून स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही न्यायावर आधारलेली लोकशाही मूल्ये भारतात रुजवली, असे प्रतिपादन वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या वतीने गांधी जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताह अंतर्गत ‘तंत्र युगातील प्रश्न आणि गांधी उपाय’ या विषयावर शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित विशेष व्याख्यानात तांबे मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संदीप तुंडूरवार यांनी भूषविले. व्याख्याते म्हणून वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे, प्रमुख अतिथी म्हणून गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा प्रमोद वाटकर यांची उपस्थिती होती. महात्मा गांधी यांनी पाश्चिमात्य संस्कृतीला ठामपणे नकार देण्याचे धाडस केले. जे त्यांच्या पूर्वी कोणीच केले नव्हते.
त्याचबरोबर सॉक्रेटिस नंतर त्या परंपरेतील चिकित्सापूर्ण चिंतनातून महात्मा गांधी यांनी अभूतपूर्व परिवर्तनाची सुरुवात आपल्याला करून दिली, असे तांबे पुढे बोलताना म्हणाले. महात्मा गांधींनी त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमांमधून अनेक संस्था निर्माण केल्या आणि नवा भारत देश घडविला. या पुढचा काळ समूहाने एकत्र येऊन आणि पर्यावरणाचे संरक्षण साधत उद्योगांचा करावा लागेल. गरजांवर आणि खर्चांवर मर्यादा आणणारी उद्यमशीलता करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील उत्पादन आणि प्रक्रिया आधारित अर्थव्यवस्था प्रोत्साहित करावी लागेल, असे तांबे म्हणाले. देशातील शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आत्मसन्मानपूर्वक रोजगार गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य आणि निवारा इत्यादी सुविधा देता आल्या पाहिजे तसेच पर्यावरणाचे संरक्षण यावर नवी संस्कृती निर्माण करता येते असा विश्वास महात्मा गांधी यांनी आपल्या प्रयोगांमधून दाखवून दिलेला आहे, असे तांबे म्हणाले.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अति आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाला कष्ट करू नका आणि विचारही करू नका या संकटावरच्या स्थितीत आणून सोडले आहे. आपल्याकडे शब्दांची संपत्ती सुद्धा नष्ट होण्याच्या या मार्गावर आणि ऑटोमयझेशन या यंत्र युगात बेरोजगारी आणि विषमतेचा दर गेल्या १२५ वर्षात सर्वाधिक आहे, असा ऑक्सकॅन या संस्थेचा अहवाल आहे. समाजाला जर माझी गरजच उरली नसेल तर माझ्या आत्मसन्मानाचे काय? असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा प्रमोद वाटकर यांनी गांधी जयंती सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका विशद केली. युवाशक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगता यावे याकरिता योग्य मार्गदर्शन आणि चुकीच्या माहितीच्या मायाजालातून सावध करण्याचे प्रयोजन असल्याचे सांगितले. विकसित झालेल्या देशांमधून जगाला विनाशाकडे जाणारा मार्ग दिसत आहे. यावर अनेक देश गांधी विचारांनी प्रेरित होऊन संशोधन आणि उपायात्मक कार्यक्रमांची आखणी करीत आहे. महात्मा गांधी यांनी वैयक्तिक प्रयत्नांतून सामाजिक बदल घडवून आणले. या गांधी परंपरेची जाणीव यावेळी प्रा वाटकर यांनी करून दिली.
डॉ संदीप तुंडूरवार यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून भारतातील संसाधने, गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर काही उदाहरण देत सांगितला. तंत्रज्ञान हे नफेखोरीवर आधारित असून मानवी नैतिकता जपताना महात्मा गांधींना आपण विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अफाट संकटाचा सामना आपल्याला स्वतःपासून सुरुवात करून अतिरेकी तंत्रज्ञान नाकारावे लागेल. कायदे जेव्हा अपुरे पडतात तेव्हा महात्मा गांधीजींची आदर्श मूल्ये आपल्याला उपयोगी पडतात, असेही डॉ तुंडूरवार म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन लेखिका डॉ मंजुषा सावरकर यांनी केले तर आभार डॉ अपरुप अडावदकर यांनी मानले. कला व समाज विज्ञान संस्था, मॉरिस कॉलेज, प्रेरणा कॉलेज, श्री बिंझानी नगर महाविद्यालय येथील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.