गोंडवाना विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन
तरुणांनी व्यावसायिक कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे – कुलसचिव डॉ अनिल हिरेखन
गडचिरोली : गडचिरोली सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे. वनाच्छादीत जिल्हा असल्याने याठिकाणी रोजगाराची वाणवा आहे. येथील तरुणांनी रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त केल्यास रोजगाराच्या अमर्याद संधी मिळू शकतात. मात्र, स्वयंरोजगारातून आपल्या कला, कौशल्य, कल्पकता व गुणांना संधी मिळते. स्वयंरोजगारातून अन्य बेरोजगारांना रोजगार देऊन बेरोजगारी कमी करता येते. त्यामुळे तरुणांनी आपले कौशल्य विकसित करत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखन यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ हिरेखन बोलत होते.
कार्यक्रमाला रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ आमुदाला चंद्रमौली, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक उत्तमचंद कांबळे, सहायक प्राध्यापक डॉ अनिरुद्ध गजके तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी, महामंडळाचे प्रतिनिधी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषण करतांना, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन म्हणाले, कंपन्यांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची निवड कौशल्याच्या आधारावर केली जाते. त्यामुळे कौशल्यपुर्ण मनुष्यबळ तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेवून विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना अल्फा अकॅडमीच्या माध्यमातून संगणकीय कोडींग, ‘सीआयआयआयटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण, तसेच विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनेला व सशोंधनाला चालना देण्यासाठी ट्र्रायसेफ नवसंशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून कौशल्याधारीत शिक्षण देण्यात येत आहे.
त्यासोबतच विद्यापीठात कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तसेच इतर क्षेत्रातही चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील तरुण हळूहळू पुढे येत आहे. विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजना तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांची अमंलबजावणी विद्यापीठाकडून केल्या जाते. युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगाराकडे देखील वळावे, जेणेकरुन इतरांना रोजगार देता येईल, असे कुलसचिव डॉ हिरेखन म्हणाले.
सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे म्हणाले, नियोक्ता आणि विद्यार्थी यांना एकत्रित आणून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. वर्षभरात जिल्ह्यामध्ये १२५ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सहायक आयुक्त शेंडे यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ चंद्रमौली म्हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये भरपूर कौशल्य भरले आहे. कौशल्याच्या जोरावरच रोजगारप्राप्ती होत असते. विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य विद्यापीठाकडून केले जात आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होतील.
कार्यक्रमाचे संचालन डॉ धैर्यशिल खामकर तर आभार प्रा डॉ उत्तमचंद कांबळे यांनी मानले.