‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे ५ एप्रिल रोजी उद्घाटन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसराचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ दि ५ ते ६ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. दि ५ एप्रिल रोजी स. १०:३० वा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते डॉ विश्वाधार देशमुख यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या स्नेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ०४:३० वा दीक्षान्त सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘एक टप्पा आऊट कॉमेडी शो’ चे विजेता बालाजी सुळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रसंगी कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि २९, ३० आणि ३१ मार्च या कालावधीमध्ये क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांच्या संयोजनाखाली विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धा (मुले/ मुली), व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले /मुली) आणि १०० मीटर धावणे अशा विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून दि ५ एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा होणार आहेत. तर ६ एप्रिल रोजी सकाळी दीक्षान्त कक्ष येथे नृत्य स्पर्धा आणि फॅशन शो या स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी ठीक ०४:३० वा स्नेहसंमेलनाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
तरी विद्यापीठ परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन स्नेहसंमेलनामध्ये बहुसंख्येने आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव व विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक डॉ शैलेश पटवेकर यांनी केले आहे.