‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील वार्षिक स्नेहसंमेलन ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ दि. ५ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. दि. ५ एप्रिल रोजी  अधिसभा सभागृहामध्ये स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर हे होते. प्रसिद्ध व्याख्याते डॉ विश्वाधार देशमुख यांच्या शुभहस्ते अत्यंत जल्लोषात स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, व्यवस्थापन परिषद सदस्य हनुमंत कंधारकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव विद्यापीठ परिसर प्रभारी प्राध्यापक डॉ शैलेश पटवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी प्रास्ताविकातून स्नेहसंमेलनामागची भूमिका विशद केली. तर उद्घाटकीय मनोगतातून प्रसिद्ध व्याख्याते डॉ विश्वाधार देशमुख यांनी आपल्या ऊर्जस्वल अमोघ वाणीतून विद्यार्थ्यांना कलेसोबत करीअर आणि करिअर बरोबर कर्तव्याची आठवण करून दिली. त्याचबरोबर गुगलला गुरु मानून आयुष्याची वाटचाल करणाऱ्या तरुणांनी आपल्या आयुष्याचा अर्थ कसा शोधावा? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपला आदर्श कसा निवडावा त्याच बरोबर आपल्या आयुष्याची उभारणी करत असताना गुरु किती महत्त्वाचा आहे. याबाबत  अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत आपल्या अमोघ वाणीने सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

Advertisement

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांनी उच्च महत्वाकांक्षी व उदात्त ध्येयवादी असले पाहिजे. हे सांगतानाच समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व काय आहे. हे सांगून विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर फोकस केलं पाहिजे. त्याचबरोबर कम्फर्ट झोन सोडून आत्मविश्वासाने बाहेर येऊन जगातील आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे. त्याचबरोबरच कला संस्कृतीचेही संगोपन केले पाहिजे. असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी आजीवन अध्ययन व सेवा विस्तार चे संचालक डॉ वैजनाथ अनमुलवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ पी विठ्ठल, दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ विनायक जाधव, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदीश कुलकर्णी, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ संगीता माकोने व विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ राहुल चौधरी यांनी केले. तर विद्यापीठ परिसर प्रभारी प्राध्यापक डॉ शैलेश पटवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page