देवगिरी महाविद्यालयात देवगिरीवाणी ९०.०० या एफ एम रेडीओ स्टेशनचे उद्घाटन
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा देवगिरीवाणी ९०.०० या एफ एम रेडिओच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रात प्रवेश – आ सतीश चव्हाण
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयात देवगिरीवाणी ९०.०० या एफ एम रेडीओ स्टेशनचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कम्युनिटी रेडियोचे महत्व सांगत असताना ते म्हणाले की ” रेडियो ही जनसंपर्काचे स्वातंत्रपूर्व काळापासून महत्वाचे माध्यम आहे. जनमानसात त्याचा मोठा प्रभाव आजही टिकून आहे. म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले होते.
देवगिरीवाणी कम्युनिटी रेडियोच्या माध्यामातून शिक्षण, समाज, संस्कृती, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान या याबाबतचे नागरिकांचे प्रबोधन व मनोरंजन होईल. तसेच या माध्यमातून संप्रेक्षणक्षेत्रातील नवीन संधी महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी खुली होईल. जेंव्हा आपत्कालीन परिस्थितीत सर्व संपर्क माध्यमे बाधित होतात तेंव्हा ‘हँम’ रेडियोने केलेले कार्य आजही मला आठवते. त्याधर्तीवर आपले हे नवे देवगिरीवाणी ९०.०० (आवाज मराठवाड्याचा) रेडियो स्टेशन कार्य करेल विश्वास असा मला आहे.
याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, डॉ प्रकाश भांडवलदार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ आदित्य येळीकर, ९८.३ रेडियो एफ एम ची निवेदिका निमिषा धारूरकर,उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, डॉ विष्णू पाटील, प्रा सुरेश लिपाने, प्रा नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्तविकातून प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी महाविद्यालयाची रेडियो सुरु करण्यामागील भूमिका विशद केली. विद्यार्थाना आम्ही औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध करून देत आहोत. देवगिरी वाणी ही विद्यार्थांसाठी ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजनाचे व्यासपीठ झाले पाहिजे. या व्दारे विविध तज्ञाच्या मुलाखतीच्या माध्यामातून नवीन माहिती त्रोत निर्माण होईल तसेच समाज प्रबोधन व विविध जाणीव जागृती वर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व महाविद्यालयातील उपक्रमशील विद्यार्थांन याचा फायदा होईल असे ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख डॉ समिता जाधव यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.