‘स्वारातीम’ विद्यापीठात अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाचे उद्घाटन

अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक – डॉ गिरीश मोरे

नांदेड : वाचक म्हणून आपण आपल्या मनाचा सैलपणा वाढवायला हवा. जातीच्या, प्रदेशाच्या संकुचित गोष्टीतून आपण बाहेर पडलो तर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे व्यापकत्व लक्षात येईल. त्यांच्या अनुभूतीचा परीघ अत्यंत विस्तृत होता. विशिष्ट विचारसरणीत अण्णा भाऊ साठे कधीही अडकून पडले नाहीत. त्यांच्या साहित्यातला माणूस विशिष्ट जातीचा नाही, धर्माचा नाही. कारण अण्णा भाऊ साठे हे वैश्विक भान असलेले प्रतिभावंत लेखक होते. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ गिरीश मोरे यांनी केले.

प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे होते. यावेळी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ पी विठ्ठल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, उपकुसचिव डॉ रवी एन सरोदे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, मारोती ब्रम्हे आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी डॉ पी विठ्ठल यांनी प्रास्ताविक केले. अण्णा भाऊ साठे ४९ वर्षाचे आयुष्य लाभले. तरीही त्यांनी वैविध्यपूर्ण आणि चौफेर लेखन केले. पोवाडे, गाणी, कथा, कादंबरी, लोकनाट्य अशा साहित्याच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी लेखन केले. वाटेगाव ते मुंबई आणि मुंबई ते रशिया हा त्यांचा प्रवास आणि हे त्यांचे स्थलांतर खूप महत्त्वपूर्ण आहे. या स्थलांतरामुळेच त्यांना विविध सुख-दुःखे पाहता आली. त्यामुळेच ते जागतिक दर्जाचे लेखन करू शकले. अण्णा भाऊ हे खूप संवेदनशील लेखक होते. म्हणूनच त्यांच्या लेखनात जागतिक संदर्भ येतात.

यावेळी कुलसचिव डॉ ढवळे म्हणाले ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे सर्वांनी परिशिलन करायला हवे’ समाज बदलासाठी त्यांचे विचार खूप उपयुक्त ठरणारे आहेत. दुसऱ्या सत्रात ‘अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर डॉ मारोती कसाब यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गजानन इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, काळबा हनवते, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्धव हंबर्डे, संदीप एडके, मारोती ब्रह्मे, डॉ हर्षवर्धन दवणे, ॲड भीमराव रामजी, सचिन दाढेल, गोपाळ वाघमारे, शुभम महाजन, श्रीकांत स्वामी, शंकर शिंगारपुतळे, रामदास वागतकर, शशिकांत हटकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page