शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : राजा माने

कोल्हापूर : डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार केले असून लवकरच ते धोरण जाहीर होईल, अशी माहिती डिजिटल मीडिया पत्रकार संपादक परिषदेचे अध्यक्ष राजा माने यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात पीएम उषा अंतर्गत डिजिटल माध्यम उद्योग या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार, संपादक डॉ दशरथ पारेकर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

Inauguration of a two-day workshop at the Department of Journalism and Mass Communication, Shivaji University
जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल माध्यम उद्योग या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ संपादक राजा माने. डावीकडून डॉ राजेंद्र पारिजात, डॉ दशरथ पारेकर, प्रा डॉ निशा पवार

 राजा माने म्हणाले, कोविडच्या कालखंडानंतर डिजिटल माध्यमांचा प्रसार आणि प्रभाव वाढला आहे. या माध्यमात काम करणारे हजारो पत्रकार राज्यभर विखुरले आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही अनेक पत्रकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. डिजिटल पत्रकारांना सध्या कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्यामुळे या माध्यमात काम करणाऱ्यांना पत्रकार म्हणायचे की नाही, याविषयी संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करावी यासाठी संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. डिजिटल माध्यमांचे आर्थिक मॉडेल तयार व्हावे आणि इतर माध्यमाप्रमाणे डिजिटल माध्यमांनाही शासकीय जाहिराती मिळाव्यात, यासाठी संघटना काम करत आहे. संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने डिजिटल माध्यमांचे धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हे धोरण सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केले जाणार आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी सायबरचे निवृत्त प्राध्यापक डॉ राजेंद्र पारिजात यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डिजिटल माध्यमांमध्ये ऑटोमेशन, व्हिडिओ, ऑडिओ आदी अनेक गोष्टी येत आहेत. खर्च कमी असल्याने खूप लोक या माध्यमाकडे वळत आहेत. डिजिटल माध्यमांमध्ये नेमकं काय करायचं आहे, याच्या संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. अनेकांना या संकल्पना स्पष्ट नसल्याने त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. यासाठी डिजिटल विश्वातून रियल विश्वामध्ये डोकावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दशरथ पारेकर म्हणाले, माध्यमाच्या परिघावरून लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हद्दपार झाले आहेत. पर्यावरणासह लोकांच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न उग्र होत असताना माध्यमे केवळ भावनिक मुद्दे हातात घेताना दिसतात. माध्यमांची विश्वासार्हता खूप महत्त्वाची गोष्ट असल्याने डिजिटल माध्यमांनी विश्वासार्हता जपावी. राज्य सरकार डिजिटल माध्यमांसाठी नवे धोरण तयार करत असले तरी नियमानाच्या नावाखाली माध्यम स्वातंत्र्य हरवणार नाही, लेखन स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दुपारच्या सत्रामध्ये पुणे येथील दैनिक सकाळचे वृत्त संपादक धनंजय बिजले यांनी डिजिटल माध्यमांचा मुद्रित माध्यमांवरील झालेल्या परिणामाबद्दल विवेचन केले. ते म्हणाले, माहितीचा विस्फोट झाला असल्याने प्रत्येकाकडे माहिती उपलब्ध आहे. भारत प्रचंड मोठी बाजारपेठ असून भारतात डेटा खूपच स्वस्त आहे. परिणामी डिजिटल माध्यमांचा विस्तार भारतात सर्वाधिक गतीने होत आहे; पण त्याचवेळी फेक न्युजचा धोकाही वाढलेला आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे वर्तमानपत्रांवर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झालेले आहेत.

ट्विटरच्या आगमनानंतर वर्तमानपत्रातील शब्दसंख्येवर मर्यादा आली. लेआउटमध्ये बदल झाला. त्याशिवाय बातम्यांचे प्राधान्यक्रमही बदलले. विशेषतः अतिस्थानिक आशय वाढून लक्षसमुहांसाठी बातम्या लिहिणे सुरू झाले. इंफोग्राफिक्सचा वापरही वाढला. क्यू आर कोडसारखे नवे विषय दैनिकांमध्ये आले. तथापि इतक्या वर्षानंतर मुद्रित माध्यमांना आपला वाचक नेमका कोण आहे आणि कुठे आहे याची वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध करता आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सांगली येथील सायबर जुरिक्सचे अध्यक्ष आर विनायक म्हणाले, डिजिटल माध्यमांमध्ये आशय निर्मिती सर्वात महत्त्वाची आहे. आशयाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास तो असे अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आशयामध्ये स्क्रिप्ट रायटिंग हा सगळ्यात मूलभूत मुद्दा आहे. आशयाचे नियोजन करणे आणि योग्य उद्दिष्ट समोर ठेवून संबंधितापर्यंत तो पोहोचवणे डिजिटल माध्यमांसाठी आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि नवे प्रवाह याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

स्वागत आणि प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा डॉ निशा पवार यांनी केले. यावेळी ऐतवडे येथील वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रताप पाटील, आनंदा पांढरबळे यांच्यासह वारणा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच तिटवे येथील शहीद लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ चंद्रशेखर वानखेडे यांनी तर आभार डॉ शिवाजी जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page