अमरावती विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील अद्ययावत फिटनेस उपकरणांचे कुलगुरूंच्या हस्ते लोकार्पण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्या फिटनेस युनिटमधील अद्ययावत उपकरणांचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ गोविंद कासट, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राव्दारे आयोजित करण्यात येणा-या उपक्रमांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी डॉ गोविंद कासट यांनी व्यायामाचे महत्व सांगतांना विद्यापीठात स्थापित आरोग्य केंद्राचे किती महत्व आहे, याविषयी प्रशंसा केली. कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांविषयी समाधान व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
प्रास्ताविकातून आरोग्य अधिकारी डॉ स्मिता थोरात यांनी आरोग्य केंद्रामधील उपलब्ध सुविधांची माहिती तसेच नव्याने आलेल्या उपकरणांच्या उपयुक्ततेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डायबिटीज असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी राजेश पिदडी यांनी केले. कार्यक्रमाला सहा कुलसचिव जय भडके, सहा कुलसचिव आर जे सयाम, उद्यान अधीक्षक अनिल घोम, विलास काकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता बाळापुरे, निलेश, शैलेश भट यांनी प्रयत्न केले.