शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या हस्ते शैलीदार फटकेबाजीने उद्घाटन

बॅडमिंटनमध्ये तंत्रज्ञान अधिविभाग प्रथम; बुद्धीबळात आदित्य सावळकर, प्रतीक्षा गोस्वामी विजेते

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या चारदिवसीय शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात पहिल्या दिवशी झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम क्रमांक पटकावला, तर बुद्धीबळ स्पर्धेत क्रीडा अधिविभागाचा आदित्य सावळकर आणि तंत्रज्ञान अधिविभागाची प्रतीक्षा गोस्वामी विजेते ठरले.

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात (दि. ४) पहिल्या दिवशी क्रीडा अधिविभागाच्या हॉलमध्ये पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अठरा संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे असा- तंत्रज्ञान अधिविभाग, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी व एग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट अधिविभाग.

Advertisement

विद्यार्थी वसतिगृहाच्या सभागृहात पुरूष व महिला गटाच्या बुद्धीबल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुरूष गटात एकूण ८० जणांनी  तर महिला गटात ३२ जणींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा- पुरूष गट: आदित्य सावळकर (क्रीडा अधिविभाग), धैर्यशील सरनोबत (तंत्रज्ञान अधिविभाग), राहुल लोखंडे (राज्यशास्त्र अधिविभाग). महिला गट: प्रतीक्षा गोस्वामी (तंत्रज्ञान अधिविभाग), पूनम वानोळे (पर्यावरण अधिविभाग), शुभांगी जगताप (पर्यावरण अधिविभाग).

तत्पूर्वी, क्रीडा अधिविभागाच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. दोघाही मान्यवरांनी फलंदाजी करून हे उद्घाटन केले. दोघांच्या शैलीदार फटकेबाजीने हे उद्घाटन रंगतदार स्वरुपाचे झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनीही गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करीत खेळाडूंचा उत्साह वृद्धिंगत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page