पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांवर अभ्यासक्रम तयार करा – नरेंद्र पाटील
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.




बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, व्याख्याते विशाल गरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा देवानंद चिलवंत, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी गायकवाड, पारस गायकवाड, अनंत जाधव, चन्नवीर बंकुर, सोमनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा सचिन गायकवाड यांनी केले.
नरेंद्र पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात बंड पुकारून रयतेच्या तसेच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढले आणि बलिदान दिले. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन झाले, याविषयी आनंद आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच संशोधन व्हावे. भविष्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधीकरिता निश्चितच मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कुलगुरू प्रा प्रकाश महानवर म्हणाले की, विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यासंदर्भात मागणी होती, आज ती विद्यापीठ फंडातून सुरू झाली. आता या अध्यासनासाठी स्वतंत्र भव्य संकुल तसेच रिसर्च सेंटर सुरू करण्याकरिता व्यवस्थित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधी आणि नरेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभेल. सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच अध्यासन केंद्र नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर आज संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वांनी यापुढे जास्तीत जास्त वृक्षारोपण करू या, असा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमात एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, यशस्वी खेळाडू, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मान्यवरांचा परिचय डॉ विकास शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक कुलसचिव तथा अध्यासनाचे सचिव डॉ शिवाजी शिंदे यांनी केले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन श्री नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, व्याख्याते विशाल गरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत व अन्य.