डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून केलेले कार्य ऐतिहासिक – माजी विभाग प्रमुख डॉ मधुकर कासारे, अर्थशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय वर्धा
बहिष्कृत हितकारिणी सभेला १०० वर्षे पूर्ण झाल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागात परिषद
नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून केलेले कार्य ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन यशवंत महाविद्यालय वर्धा येथील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ मधुकर कासारे यांनी केले. २० जुलै १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्याला २० जुलै २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात एक दिवसीय परिषदेचे आयोजन शनिवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यावेळी परिषदेचे उद्घाटन करताना डॉ कासारे मार्गदर्शन करीत होते.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी भूषविले तर व्याख्याते म्हणून यशवंत महाविद्यालय वर्धा येथील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मधुकर कासारे यांची उपस्थिती होती. कामांची मोठी जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती. पण ते घाबरले नाहीत किंवा डगमगले नाहीत, उलट तुम्ही माझ्यावर कितीही टीका केली तरी माझ्या समाजाला वाचवल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, असे वचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले होते.
यावर ते खरे उतरले हे काळाने सिद्ध केले आहे. म्हणूनच बहिष्कृत हितकारिणी सभेला आज १०० वर्षे झाली असली तरी तिच्या कार्याचे महत्त्व अबाधित आहे, असे पुढे बोलताना डॉ. कासारे म्हणाले. बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सामाजिक संस्था होती. यातून त्यांनी शिकवा, चेतवा आणि संघर्ष करा, असे आवाहन केले, असे डॉ. कासारे म्हणाले. समाजाचा उद्धार कसा होईल. याचा विचार केला. त्यांनी शिक्षणावर भर दिला आणि त्याचा प्रचार केला. त्यांनीच महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. वाचनालयाची सुरुवात त्यांनीच केली. हे त्यावेळी आवश्यक होते, अन्यथा अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण कधीच मिळाले नसते. त्यांनी शिक्षणाप्रती जनजागृती केली.
औद्योगिक व कृषी शाळा सुरू करण्याचे श्रेयही त्यांना जाते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून त्यांनी सर चिमणलाल सेटवाल, डॉ. परांजपे, बी.जी. खेर यांच्यासारखे प्रसिद्ध लोकांना जोडले. इतर वृत्तपत्रांनी दलितांच्या प्रश्नांना स्थान दिले नाही म्हणून त्यांनी समाजापर्यंत संदेश देण्यासाठी बहिष्कृत भारत साप्ताहिक सुरू केले, असे डॉ. कासारे म्हणाले. दामोदर हॉलपासून सुरू झालेली चिंतन प्रक्रिया सातत्याने १९५६ पर्यंत चालू होती. त्यांच्या सर्व कार्यकृतीचे महत्त्व आजही कायम असल्याचे डॉ. कासारे म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. अविनाश फुलझेले यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम होते, असे सांगितले. या सभेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार मांडले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक मान्यता मिळाली, असे डॉ. फुलझेले म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन किरण उमरे यांनी केले तर आभार दिलीपकुमार लेहगावकर यांनी मानले.
राज्यघटनेने विषमता नष्ट केली : गोडघाटे
उद्घाटन सत्रानंतर चार स्वतंत्र चर्चा सत्रे झाली. पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अशोक गोडघाटे म्हणाले की, भारतातील गुलामगिरीचे मूळ धार्मिक व्यवस्थेत असल्याचे दिसते. राज्यघटनेने विषमता नष्ट करून मानवी मूल्ये दिली. संविधानाच्या निर्मात्यांनी हे मानवाधिकार देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केले. सत्राचे संचालन अशोक जामगडे यांनी केले तर आभार रमेश गजभिये यांनी मानले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती तर तिसऱ्या व चौथ्या सत्रात डॉ. संजय शेंडे व डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.