एमजीएम विद्यापीठात ‘इन कन्वरसेशन विथ अ न्यूजरूम लीडर’ विषयवार संवाद सत्र संपन्न

समाजातील शेवटच्या माणसांसाठी काम करणे हीच खरी पत्रकारिता – वरिष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे

छत्रपती संभाजीनगर : आपल्याला चांगला पत्रकार व्हायचे असेल तर ज्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही अशा ‘व्हाईस ऑफ दि व्हाईसलेस’ व्यक्तींसाठी काम केले पाहिजे. विशेषत: समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या जाणीवेसह पत्रकारिता काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार तथा बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कॅम्युनिकेशन, कल्चर आणि मिडियाच्या वतीने ‘इन कन्वरसेशन विथ अ न्यूजरूम लीडर’ या विषयावर विनोबा भावे सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संपादक कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्राचार्या डॉ रेखा शेळके, प्रा आशा देशपांडे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना वरिष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे म्हणाले, न्यूजरूम लीडर म्हणून काम करताना न्यूज रूममधील विविधता कशी असेल, याला महत्व असते. आणि महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये ही विविधता निर्माण करण्यामध्ये एमजीएम विद्यापीठातील पत्रकारिता महाविद्यालयाचा महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. हे महाविद्यालय अत्यंत प्रयोगशील असून येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करत आहेत.

Advertisement

डिजिटल माध्यमांचे महत्व वाढत असून हे भविष्य आहे. माध्यमांचे लोकशाहीकरण करण्याचे काम डिजिटल माध्यमांनी केले आहे. डिजिटलमुळे आज स्वतंत्र पत्रकार म्हणून कोणीही काम करू शकतो. या माध्यमात काम करत असताना काही कौशल्ये आपल्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी आपण सजग असायला हवे, अल्गोरिदम आणि तंत्रज्ञानाची माहिती असणे, बातमीची भाषा संवाद साधणारी असणे आणि व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिताना पाहणाऱ्याला त्यामध्ये गुंतवून ठेवता यायला हवे; अशा विविध कौशल्यांचा समावेश होतो असे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना वरिष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे म्हणाले, आज चांगली पत्रकारिता करण्यासाठी आपण तांत्रिकदृष्ट्या साक्षर असायला हवे. पत्रकारितेत काम करत असताना आपली आवड महत्त्वाची आहे मात्र, ही आवड जोपासत असताना आपले वाचन चौफेर पाहिजे, दररोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे, मासिके वाचली पाहिजेत, आपल्या विषयाशी निगडित माहितीपट आणि चित्रपट पाहिले पाहिजेत. या क्षेत्रात आपल्या ज्ञानाला महत्व असून यातूनच आपली प्रगती होत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भविष्यात वाढणार असून पत्रकारिता क्षेत्रासाठी हे एक आव्हान असणार आहे. यामुळे येत्या काळामध्ये नोकऱ्या जावू शकतात. अशावेळी जे एआय करू शकत नाही ते आपल्याला यायला हवे. उदाहरणार्थ एआय भाषांतर करू शकतो मात्र, त्यात भाषेचा गोडवा असणार नाही. त्यामुळे आपले लिखाण उत्तम असले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page