राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व : कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी
जळगाव, २१ नोव्हेंबर २०२४ : भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, रासेयोचे विभागीय संचालनालय पुणे, आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा समारोप १२ ते २१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मोठ्या उत्साहात झाला. समारोप प्रसंगी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, “वर्ग खोलीत मिळणारे शिक्षण औपचारिक असते, तर वर्ग खोली बाहेर मिळणारे शिक्षण अनौपचारिक असते. रासेयोच्या शिबीरातून मिळणाऱ्या अनौपचारिक शिक्षणामुळे देशाची विविधता, एकता आणि बंधुत्व यांचा अनुभव मिळतो, जो व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.”
या शिबीरात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, दमन, दादरा-नगरहवेली, गोवा या सात राज्यांतील १०० रा.से.यो. विद्यार्थी आणि १०० रा.से.यो. विद्यार्थिनींसह एकूण २०० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते. शिबीराच्या समारोप प्रसंगी, कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आणि ज्ञान व क्षमता यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “अभिमान आणि अहंकार यातील सीमारेषा समजून, वेळेचा सन्मान राखून, चतु:सूत्री अंमलात आणल्यास आपण उत्तम नागरिक होऊ शकतो.”
प्रमुख पाहुणे डॉ. अजय शिंदे यांनी रासेयो शिबीराच्या माध्यमातून माईंडसेट विकसित करण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या वतीने मीतराजसिंग जाडेजा (गुजराथ), प्रियंका विश्वास (दमण), के. जगन (तेलंगाणा), आणि अमृता दारुंटे (महाराष्ट्र) यांनी शिबीराविषयी आपले अनुभव व्यक्त केले. तसेच, संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा. शैलेश (गुजराथ), डॉ. हरीसन कोटा (गोवा), आणि डॉ. भारती (आंध्र प्रदेश) यांनी प्रतिक्रिया दिली. डॉ. सचिन नांद्रे यांनी शिबीराचा आढावा घेतला, तर डॉ. दिनेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रा. विजय पाटील यांनी आभार मानले.शिबीराच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघभावना, समन्वय, आणि आदर यासारख्या महत्त्वाच्या गुणांची जाणीव झाली आणि हे गुण त्यांच्या पुढील जीवनासाठी उपयोगी ठरतील, असे सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.