शिक्षक प्राध्यापकाच्या नेमणुका कशा कराव्यात ?
माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे
शाळेतील शिक्षक, अन् कॉलेज विद्यापीठातील प्राध्यापक हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे भवितव्य घडवित असतो.अभ्यासक्रम, कॅम्पस चे वातावरण ,इतर सोयी या गोष्टी तशा दुय्यम ठरतात.महत्वाची भूमिका शिक्षक प्राध्यापकाचीच असते.या निवडी कितपत योग्य असतात हा नेहमीच चर्चेचा वादाचा विषय ठरला आहे.यातले काही मुद्दे असे:डॉ विजय पांढरीपांडे, प्राध्यापक नेमणुक,

१ ज्यांना खरेच शिकवण्यात गोडी आहे ते या व्यवसायात येतात का? बहुतांश प्रमाणात नाही.बरेच जण इतर कुठला जॉब मिळत नाही, मजबूरी म्हणून हा जॉब स्वीकारतात.
२ कुठल्याही जॉब साठी ठराविक अर्हता आवश्यक असते.इथे उच्च शिक्षण क्षेत्रात पी एच डी,पेपर पब्लिकेशन्स यांना अवास्तव महत्व दिले जाते.पी एच डी नसलेले अनेक जण उत्तम प्राध्यापक आहेत.आमच्या वेळी इंजिनियरिंग साठी एम टेक नंतर देखील लेक्चरर म्हणून निवड होत असे. माझ्या गुरूचे गुरू पी एच डी नव्हते.पण त्यांनी डझनभर पी एच डी साठी मार्गदर्शन केले. शिवाय ते पी एच डी नसूनही पहिल्या आय आय टी चे डायरेक्टर झाले.ते उत्तम शिक्षक,उत्तम प्रशासक म्हणून नावाजले.शिक्षकी पेशा साठी विषयाचे मूलभूत द्यान,अन् ते शिकवण्याचे कौशल्य जास्त गरजेचे.संशोधन,पेपर पब्लिकेशन्स या नंतरच्या दुय्यम गोष्टी.
३ या क्षेत्रात नेमणुका करताना होणारी आर्थिक देवघेव,भ्रष्टाचार ही चिंतेचा विषय.शाळेत शिक्षक होण्यासाठी इतक्याचे पाकीट,प्राध्यापक पदासाठी अमुक रकमेचा सौदा ही भाषा सर्रास बोलली जाते.अवती भवती ची परिस्थिती,वास्तव बघता हे तथ्य नाकारता येत नाही.( मी स्वतः हे अनुभवले नसले तरीही!).
४ एखाद्याची प्राध्यापक म्हणून निवड झाली अन् ती चुकीची आहे हे लक्षात आले तरी अशा व्यक्तीला नोकरीतून काढणे सोपे नसते.अशी अनेक अवजड नकोशी ओझी शिक्षण संस्थेला जन्मभर सहन करावी लागतात.खाजगी संस्थात कदाचित घरी पाठवणे शक्य होईलही, परंतु सरकारी व्यवस्थेत ते अशक्य असते.ही डोईजड माणसे स्वतः तर काही योगदान देत नाहीतच,पण अवती भवती चे वातावरण दूषित करतात.
५ अर्धा पाऊण तासाच्या मुलाखतीतून शिक्षक,प्राध्यापकाची योग्यता तपासणे तसेही फार कठीण असते. यासाठी आय आय टी सारख्या संस्थेत उमेदवाराला दोन दिवस आधी बोलावून विभागात चर्चा करण्याची, एखादे व्याख्यान देण्याची, संधी दिली जाते. या भेटीचा फिडबॅक मुलाखत घेणाराना विभाग प्रमुखातर्फे दिला जातो.
या अन् तत्सम अडचणी लक्षात घेता शक्य तो योग्य, उत्तम निवड करण्यासाठी काय बदल करता येतील याचा विचार करू या..
१ शिक्षणासाठी विषयाचा खोल अभ्यास अन् शिकवण्याचे कौशल्य, नवीन प्रयोग करण्याची उत्सुकता, नवे तंत्र विद्यान वापरण्याची तयारी ही गुण महत्वाचे असावेत. पी एच डी, पेपर पब्लिकेशन नव्हे. कारण या संशोधन क्षेत्रात जो बाजार मांडला गेलाय तो बघता ती अर्हता कमी महत्वाची असावी.
२ योग्यता तपासण्या साठी अर्जा बरोबर उमेदवाराने स्टेटमेंट ऑफ परपज लिहावे, आपण का शिक्षक होऊ इच्छितो हे स्पष्ट करावे. शिवाय दिलेल्या शिक्षण क्षेत्राशी, विषयाशी संबंधित विषयावर एकदोन पेज चे विस्तृत मत व्यक्त करावे.आणखीन एक.. अर्जा सोबत एखादा विषय शिकवत असल्याचा, समजावत असल्याचा व्हिडिओ पाठवावा. केवळ बायोडेटा वाचून योग्यता कळत नाही. हवे तर मुलाखती आधी त्या विभागात जाऊन विद्यार्थ्या समोर एक लेक्चर द्यायला लावावे. त्यातून थोडीतरी अध्यापन कौशल्य, भाषे वरची पकड समजेल. मुलाखती आधी या प्रकारचे स्क्रिनिंग केल्यास अयोग्य उमेदवार बाद करता येतील.
३ आपली मुख्य समस्या पर्मनंट जॉब ही आहे. एकदा प्राध्यापक म्हणून चिकटला की कुणालाही दुरुपयोगी असला तरी नोकरी वरून काढणे कठीण असते. त्यासाठी पर्मनंट जॉब ही संकल्पना बाद करून आधी तीन वर्षाचा, योग्य असल्यास वाढवून पाच वर्षाचा करार करावा. म्हणजे उमेदवाराला ही चिकटून राहण्याचे बंधन नाही. अन् कॉलेज विद्यापीठावर ही अयोग्य उमेदवाराचे पर्मनंट ओझे बाळगण्याची सक्ती राहणार नाही. या काळात पी एफ वगैरे सर्व सवलती द्याव्या. १९७० च्या काळात मुंबईच्या जगमान्य टी आय एफ आर सारख्या संस्थेत हीच पद्धत होती. माझी, डॉ नारळीकर यांची नेमणूक त्या काळात अशीच झाली होती!
४ पगारी प्राध्यापक या ऐवजी मोबाईल टीचर ही संकल्पना वापरून पहावी. फिजिक्स किंवा गणिताचा एखादा उत्तम शिक्षक असेल तर त्याने जवळपास असलेल्या दोन तीन कॉलेजमध्ये एकच विषय शिकवावा. याचे त्याला सेमीस्टर चे ठराविक रोख मानधन प्रत्येक कॉलेजने द्यावे. परस्पर सामंजस्याने वेळापत्रक ठरवून घ्यावे. शिकवणे, परीक्षा घेणे, सतत मूल्यमापन करणे ही त्या शिक्षकाची एकत्रित जबाबदारी असेल. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. शिक्षकाला मासिक पगारापेक्षा तीन चार कॉलेजच्या कंत्राटी माध्यमातून जास्त उत्पन्न होईल.
कॉलेजला मासिक पगार देण्याच्या तुलनेत सेमिस्टरचे विषय निहाय मानधन देणे स्वस्त पडेल.मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तम अनुभवी प्राध्यापक मिळेल. अशा अनुभवी, उत्तम शिक्षकाचा पूल तयार करता येईल. आधुनिक तंत्रद्न्यान वापरून अटेंडस, असेसमेंट, ट्युटोरियल हे सारे प्रभावी, पारदर्शक पद्धतीने सहज शक्य आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी. मुख्य म्हणजे प्रवाहाविरुद्धः पोहण्याची तयारी हवी. त्याच त्या धूत मार्गाने जाण्या ऐवजी काळानुसार क्रांती कारक बदल स्वीकारण्याची मानसिकता हवी.
हे सगळे अनेकाना पटणार नाही. प्राध्यापक संघटना, पाकीट संस्कृतीत वाढलेले राजकारणी, काम न करता एक तारखेला पगार घ्यायची सवय झालेली सरकारी यंत्रणा या कुणालाच हे बदल स्वीकार योग्य वाटणार नाहीत. पण आमच्या सारख्या ना सांगितल्या शिवाय राहवत ही नाही…
म्हणून हा लेखन प्रपंच…

डॉ विजय पांढरीपांडे +91 7659 084 555