एमजीएममध्ये हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.० स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.०’ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, उपकुलसचिव डॉ परमिंदर कौर धिंग्रा, संचालक डॉ कपिलेश मंगल, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.० मध्ये अ मॉकटेल एक्सपेडिशन, गौरमेट आर्टीसन, मॉडेल मेकिंग, सीड स्टोरी, ब्रॉउचर डिझाईनिंग आणि टूसी मुसी आदि स्पर्धांमध्ये विविध संघांनी आपला सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या एकूण ८ संघांमधून मॉर्निंग ग्लोरी संघाने प्रथम तर ट्रफल संघाने द्वितीय क्रमांक पटकावित विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र देण्यात आले.
विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवित अत्यंत चांगल्याप्रकारे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी स्टार्टअपच्या कल्पना, नवनवीन खाद्यपदार्थ, ज्यूस, सजावट या माध्यमातून आपले कौशल्ये दाखवली. सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा क्रमांक लागत असून येथील विद्यार्थी येत्या काळामध्ये या क्षेत्रात स्वत:चे आणि संस्थेचे नाव करतील, असा विश्वास कुलपती अंकुशराव कदम यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अ मॉकटेल एक्सपेडिशन स्पर्धेसाठी प्रकाश सोनकांबळे, गौरमेट आर्टीसन स्पर्धेसाठी गोविंद सिंग, मॉडेल मेकिंग स्पर्धेसाठी अमित देशपांडे, सीड स्टोरी स्पर्धेसाठी पंकज ढोबळे, ब्रॉउचर डिझाईनिंग स्पर्धेसाठी सारंग नवल आणि टूसी मुसी स्पर्धेसाठी धनंजय पवार आदि मान्यवरांनी परीक्षण केले.