डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्यांदाच ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरु होणार
नामांकित कंपनीत अनुभव, छात्रवृत्ती मिळणार
बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्स, डाटा सायन्स, बीसीएचा समावेश
मानवशास्त्र विषयातही ’ऑनर्स’ कोर्स
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चार वर्षांचा पदवी ’ऑनर्स’ कोर्स यंदा सुरु होत आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना दोन सेमेस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असून स्टायपंड अर्थात छात्रवृत्ती ही देण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यावसायाभिमूख व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये ’अॅप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. कुलगुरु डॉ विजय फुुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी झालेल्या विद्यापरिषद बैठकीत बीएस्सी (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी एस्सी (ऑनर्स) डाटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बीए मानसशास्त्र (ऑनर्स) अशा चार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. (बीएस्सी) डेटा सायन्स ला तीस तर उर्वरति तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी ४० जागा असणार आहेत. या कोर्ससाठी बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रानिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.
नामांकित कंपन्या सोबत सामंज्यस्य करार
या चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्याचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. ’इलेक्ट्रॉनिक्स’ कंपन्यामध्ये देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स, सिमेन्स, सीटीआर अॅन्युफॅक्चरिंग, एन्ड्रेस हौजर, वेरॉक, स्टारलाईट, व्हिडोओकॉन, धूत ट्रान्समिशन, क्रिश ऑटोमेशन, फ्लॅश इलेक्ट्रानिक्स, रोजन बर्गर, अॅडोनीस, रेल्कॉन हायोसंग एक्सीटॉनिक या कंपन्यांचा समावेश आहे.
’बीसीए’ हा अभ्यासक्रम वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागात सुरु होत आहे. अॅप्रेंटिसशिपसाठी मायटेक सोल्यूशन्स, एलबीई ग्रुप, वेन्टीस, क्रिसेडो, युनिओटेक, टेव्नâक, एक्सपर्ट ग्लोबल, जेएलएल, बुस्ट मिडीया, टेक सुर्या, एचडीएलसी, इमॅजिका व ब्रेन टेक सॉप्टवेअर या कंपन्यांचा समावेश आहे तर ’डाटा सायन्स’ हा अभ्यासक्रम संगणकशास्त्र विभागात सुरु होत आहे. यासाठी एक्सपर्ट ग्लोबल सोलूशन, यशश्री प्रेस, फाईंड एॅबिलीटी सायन्सेस या कंपन्याचा समावेश आहे. तर बी ए मानसशास्त्र विभागात सुरु होत आहे. या कोर्ससाठी शहरातील नामांकित मानसिक रुग्णालये, शांती नर्सिंग होम, डॉ कादरी मेन्टल हॉस्पिटल, तुपकरी हास्पिटल व प्रणित कौन्सिलींग सेंटर चा समावेश आहे.
नोकरी, रोजगार देणारे अभ्यासक्रम – प्र-कुलगुरु
पदवी, पदव्यूत्तर पदवी घेतल्यानंतरही रोजगाराच्या संधी न मिळालेल्या पदवीधरांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर ’मल्ट्रीपल एन्ट्री व मल्टीपल एक्झीट’ या तत्वावर सुरु होणारे हे चार ही अभ्यासक्रम शंभर टक्के रोजगार व स्वयंरोजगाराची हमी देणारे असणार आहेत, अशी प्रतिक्रिया प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांनी व्यक्त केली. ’सीएमआयए’ सह औद्योगिक संस्था सोबत घेऊन हे कोर्स सुरु करण्यात येत आहेत. या संदर्भात शहरातील उद्योजकांची येत्या १० जून रोजी विद्यापीठात बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली.