महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील शिवाजी विद्यापीठाच्या यशस्वी खेळाडूंचा गौरव
कोल्हापूर : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२३-२४ मधील उज्ज्वल कामगिरीबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात २५ वी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या पहिल्या टप्यात शिवाजी विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स (पुरुष व महिला) संघाने सर्वसाधारण विजेतेपद, बॅडमिंटन (पुरुष व महिला) संघाने तृतीय क्रमांक, टेबल टेनिस (पुरुष) संघाने तृतीय क्रमांक, व्हॉलीबॉल (पुरुष) संघाने द्वितिय क्रमांक असे देदीप्यमान यश प्राप्त केले. या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यशस्वी क्रीडापटूंचे अभिनंदन केले, त्याचप्रमाणे क्रीडापटूंना आवश्यक अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी क्रीडा महोत्सव स्पर्धेचे पथकप्रमुख डॉ. सुनील चव्हाण यांनी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीविषयक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. एन. डी. पाटील, डॉ राजेंद्र रायकर, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. राहुळ इंगळे, डॉ. सविता भोसले, डॉ. इब्राहीम मुल्ला, अजय मराठे, सचिन पाटील यांच्यासह क्रीडापटू विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. प्रा. किरण पाटील, प्रा. सुचय खोपडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी क्रीडा अधिविभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सदर क्रीडा महोत्सव स्पर्धेतील दुसऱ्या टप्याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल विद्यापीठ, लोणेरे येथे करण्यात आले आहे.