नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने रक्तदान नेत्र-दंत तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित रक्तदान, नेत्र, दंत, त्वचा व हेयर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवार, दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तपासणी शिबिर पार पडले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, रक्तपेढीचे डॉ निखिल डोरले, नेत्र चिकित्सक डॉ चित्रा पार्डीकर, दंत व त्वचा तज्ञ डॉ प्रिया सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी मनुष्याचे शरीर नश्वर असले तरी त्यांचे विचार जिवंत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहतात. समाजाचे देणे लागत असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांनी कर्मचारी मित्र परिवाराचे कौतुक केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या पथकाने रक्तदान शिबिर राबविले. यामध्ये बीटीओ डॉ निखिल डोरले, अजय डोंगरे, प्रफुल्ल सोनटक्के, रूपाली कावळे, संदीप आरलेख, कार्तिक बंड, नम्रता रायमले, तनिषा म्हैसकर, शर्वरी गोल्लर, दिनेश दहिकर यांनी सहकार्य केले.
नेत्र तपासणी शिबिराला लेंसवाला ऑप्टिकल येथील डॉ चित्रा पार्डीकर, गायत्री बालपांडे, कमलेश डेकापूरवार, अश्विन चव्हाण यांचे सहकार्य लाभले. स्माईल डेंटल क्लिनिक अँड स्किन हेअर क्लिनिकच्या डॉ प्रिया सुरज सूर्यवंशी यांनी दंत तपासणी, त्वचा तसेच हेयर संबंधित आजाराबाबत कर्मचाऱ्यांची तपासणी केली. कार्यक्रमाचे संचालन दीपक घोडमारे यांनी केले. रक्तदान, नेत्र, दंत तपासणी त्वचा व हेअर तपासणी शिबिराला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहत तपासणी करून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ कर्मचारी मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.