आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित हेल्थ रन – 2024 मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी 30 सप्टेंबर अंतीम मुदत
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित MUHS Health Run – 2024 मॅरेथॉन स्पर्धेचे दि 19 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या नांव नोंदणीसाठी दि 30 सप्टेंबर 2024 अंतीम मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. सध्याच्या व्यस्त जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी MUHS Health Run – 2024 मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा पिढीने शारिरीकदृष्टया बळकट आणि तणावमुक्त रहावे यासाठी चालणे किंवा धावणे आवश्यक आहे. सकाळी नियमित चालल्यास शरिरात रक्तपुरवठा सुरळीत राहतो त्यामुळे हृदयरोग, मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता कमी असते. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळातही सहभाग वाढवावा यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मानसिक ताण-तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वांनी नियमित व्यायामाचा अंगीकार करावा असेही त्यांनी सांगितले.
याबाबत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून समाजात आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यापीठातर्फे हेल्थ रन – 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे व धावण्याचे महत्व सर्वांना पटावे यासाठी MUHS Health Run – 2024 च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेत सभागाकरीता ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरु करण्यात आली असून दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नांव नोंदणीची अंतीम मुदत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, MUHS Health Run – 2024 स्पर्धेत स्पर्धकांनी दहा किलोमीटर, पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अंतर धावत विहित वेळेत पूर्ण करावयाचे आहे. याकरीता ऑनलाईन पध्दतीने नांव नोंदणी केल्यानंतर वयोमानानुसार गट तयार करण्यात आले आहेत. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या मार्गीकेवर दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी सहा वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेल्थ्य फॉर रन – 2024 मॅरेथॉन स्पर्धेसाठी रोडोमीटर प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांच्या हस्ते पुजन
विद्यापीठातर्फे आयोजित हेल्थ्य फॉर रन – 2024 मॅरेथॉन स्पर्धेसाठी रोडोमीटर अंतर मापनासाठी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यंाच्या हस्ते पुजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी मा. प्रति-कुलगुरु यांच्या हस्ते विद्यापीठात रोडोमीटरचे पूजन करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेकरीता दहा किलोमीटर, पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अंतराचे विद्यापीठाच्या क्रीडा समितीकडून मापन करण्यात आले. या रोडोमीटरच्या पुजनाप्रसंगी कुलसचिव कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड. संदीप कुलकर्णी, डॉ. देवेंद्र पाटील, एन.व्ही.कळसकर, ब्रिग. सुबोध मुळगंुद, डॉ. मृणाल पाटील, महेंद्र कोठावदे, डॉ. नितीन कावेडे, डॉ. सुनिल फुगारे, डॉ. आर.टी. आहेर, संदीप राठोड, डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. स्वप्नील तोरणे, योगेश राऊत, सुरेश शिंदे, नंदकिशोर ठाकरे, राजेंद्र शहाणे, योगिता पाटील, राजेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड. संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ऑनलाईन पध्दतीने नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. नांव नोंदणीसाठी विद्यापीठाने नामनिर्देशित केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता रुपये तीनशे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना रुपये पाचशे मात्र इतके नोंदणी शुल्क अदायगी करावे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र व हमीपत्र सादर करणे अनिवार्य आहे. स्पर्धा समाप्तीनंतर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेकरीता विद्यापीठाने नामनिर्देशित केलेल्या संलग्नित महाविद्यालयांना स्पर्धेची माहिती व ऑनलाईन पध्दतीने नोंदणी संदर्भात लिंक पाठविण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठात 0253-2539111 दूरवध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. MUHS Health Run – 2024 स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.