डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात प्रा वा मो उपाख्य दादासाहेब काळमेघ यांना अभिवादन
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा वासुदेवराव मोतिरामजी उपाख्य दादासाहेब काळमेघ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ पवन टेकाडे होते, तर प्रमुख उपस्थितीत डॉ पद्माकर सोमवंशी, डॉ पुष्पा जुनघरे, डॉ सोमेश्वर निर्मळ, डॉ अजय जावरकर आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरूवात दादासाहेब काळमेघ यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी डॉ टेकाडे, डॉ सोमवंशी, आणि डॉ निर्मळ यांनी दादासाहेब काळमेघ यांच्या शिक्षण, विज्ञान, अध्यात्म आणि प्रशासकीय कौशल्यावर प्रकाश टाकत, त्यांचे जनकल्याणासाठीचे योगदान स्मरण केले. दादासाहेब काळमेघ हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकहितकारी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध होते, तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषवून उच्चशिक्षण क्षेत्रात विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी डॉ स्वप्निल मोहोड यांनी मानले.