सामुहिक वनहक्क क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभांचा सत्कार

एकल लोकसहभागातुन ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रम

गडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या एकल लोकसहभागातुन ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमातंर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभा, सहयोगी मित्र, केंद्र समन्वयक, मार्गदर्शक यांचा सत्कार गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. सदर कार्यक्रम गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेवराव किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मानव विकास मिशन कार्यक्रम 2022-23 अंतर्गंत ग्रामसभांना गोडाऊन बांधकाम करणे या योजनेतंर्गंत खेळते भांडवल प्रति ग्रामसभा रु 9 लक्ष याप्रमाणे 13 ग्रामसभांना 1 कोटी 17 लक्ष रुपयाचे सामुहिक धनादेश या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

Advertisement

संपूर्ण भारतात सर्वप्रथम सामूहिक वनहक्क प्राप्त करणारा तसेच सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित नियम 2012 अंतर्गत जिल्ह्यात एकूण 1109 ग्रामसभांना सामूहिक वनहक्क दावे प्राप्त आहेत. सदर कायद्याच्या अनुषंगाने, सामूहिक वनहक्क क्षेत्राचे कामकाज पाहण्याकरिता सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. एकल लोकसहभागातून ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमाच्या मार्गदर्शनातून या समिती अंतर्गत ग्रामसभांना सामूहिक वनहक्क क्षेत्रात जंगल संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ग्रामसभा मानव विकास अंतर्गत गोडाऊन बांधकाम, नरेगा ऐंजीस (ऑनलाईन नरेगा पोर्टलवर नोंदणी) माध्यमातून सामूहिक वनहक्क क्षेत्रात घेण्यात येणारी कामे अशी विविध प्रकारची कामे करत आहेत.

ग्रामसभांच्या सर्व कार्याची दखल घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगी मित्र, ग्रामसभा व मार्गदर्शकांचे जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी संजय दैने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभांचे व सहयोगी मित्रांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी एकलचे नोडल अधिकारी चेतना लाटकर, कृषितज्ञ मंगेश भानरकर, एकल कार्यक्रमाचे समन्वयक डॉ नरेश मडावी, सहसमन्वयक डॉ नंदकिशोर मने, एकल सेंटर समन्वयक चंद्रकांत किचक, सुरज चौधरी व निलेश देसाई आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page