एमजीएम इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपीचा पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

प्रगतीसाठी आयुष्यभर शिकत राहणे आवश्यक – कुलगुरू डॉ राजन वेळूकर

छत्रपती संभाजीनगर : आज आपण आपल्या जीवनात एक स्थान प्राप्त केले असून व्यावसायिक क्षेत्रात जात असताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. यातील पहिला नियम म्हणजे ‘मी जीवनभर शिकत राहणार’ हा आहे. आपल्या आयुष्यात विकास आणि प्रगती करायची असेल तर आयुष्यभर शिकत राहावे लागेल. कारण, दररोज तंत्रज्ञान बदलत असून नवनवीन तंत्रज्ञान आपण शिकायला पाहिजे, असे प्रतिपादन ऍटलास स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजन वेळूकर यांनी यावेळी केले.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीचा चौथा पदवी वितरण समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. यावेळी, डॉ वेळूकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या पदवी वितरण सोहळ्यास महात्मा गांधी मिशनचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त भाऊसाहेब राजळे, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ अपर्णा कक्कड, डॉ एच आर राघवन, प्राचार्य सरथ बाबू, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, प्रा डॉ वैभव कापरे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ वेळूकर म्हणाले, आजचा दिवस वेगळा असून आपण सगळे आपले यश साजरे करण्यासाठी एकत्रित आला आहेत. आपण भाग्यशाली आहात, कारण अगोदर अशाप्रकरे महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण समारंभ होत नसत. आपले आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांचे मी अभिनंदन करतो. शिक्षकांनी आपल्याला जे ज्ञान दिले ते आपल्या आयुष्यभराची शिदोरी आहे. आपल्या या प्रवासात पालकांनी आपल्याला एक वातावरण देत आर्थिक आणि भावनिक सहकार्य केले असून त्यांचेही यानिमित्त अभिनंदन करणे आवश्यक आहे. आज सगळ्यात जास्त फिजिओथेरपी क्षेत्राची गरज आहे. आपण फिजिओथेरपीच्या क्षेत्रात आता येत आहात. मात्र, या क्षेत्रात पदार्पण करीत असताना आपल्याला आता इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी आणि ट्रान्सडिसिप्लिनरी अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल.

आपला दृष्टिकोण बदलण्यासाठी ‘दि चेकलिस्ट मॅनिफेस्टो’, ‘व्हाय वुई डाय?’ आणि ‘एव्हरी पेशंट टेल्स अ स्टोरी’ ही पुस्तके आपण वाचने आवश्यक आहेत. आपण खूप नशीबवान आहेत कारण, आपल्याला एमजीएममध्ये शिकण्याची संधी मिळाली. ७०% लोकांकडून स्वत:साठी कमवत जितके व्यावसायिक शुल्क आहे तितके घ्या,  २०% लोकांकडून कमी शुल्क घ्या आणि १०% लोकांकडून अजिबात शुल्क घेऊ नका. हा नियम पाळत आपण आपला व्यवसाय केला तर आपण महान बनाल, असा विश्वास डॉ वेळूकर यांनी व्यक्त केला.

Advertisement

यावेळी बोलताना डॉ पी एम जाधव म्हणाले, आपण आज आपले शिक्षण पूर्ण करून जात असला तरी आपले ऋणानुबंध कायम असेच असतील. आपण ज्ञानासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी एमजीएममध्ये कधीही येऊ शकता. अगोदरच्या काळामध्ये फिजिओथेरपी क्षेत्र नव्हते गावामध्ये वस्ताद असतं तेच हे काम करीत असत. आता अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असून आपण आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीमधून शिक्षण घेतले आहे. आपल्या मदतीने रुग्ण आजारातून लवकर बरा होतो. आपण महाविद्यालयातील मित्रांना आणि शिक्षकांना कधीही विसरणार नाहीत, या विश्वासासह आपल्या पुढील यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा!

दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.आज झालेल्या या सोहळ्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या एकूण ६८ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. तसेच शैक्षणिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या अंकाचे विमोचन करण्यात आले. प्राचार्य सरथ बाबू यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाची माहिती यावेळी सादर केली. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी ‘ओथ ऑफ अ फिजिकल थेरपिस्ट’ ही शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वैभव कापरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डॉश प्रकाश आणि डॉ गौतमी खाडगे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सुवर्ण पदकासह इतर पदके प्राप्त विद्यार्थ्यांची नावे :

१.             डॉ गौरी जोशी : बॅचलर ऑफ फिजिओथेरफीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात प्रथम येत सुवर्ण पदक प्राप्त केले. रुक्मिणीदेवी कदम गोल्ड मेडल फॉर ग्रॅज्युएट्स पदक प्राप्त केले. तसेच त्यांनी द्वितीय वर्षात किनेसीओथेरॅपी या विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्यांना सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम ८२००० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.

२.             डॉ समृद्धी नावडे : सर्जरी II आणि सर्जरी III विषयात विद्यापीठातून सर्वाधिक गुण प्राप्त करीत सुवर्ण पदक प्राप्त केले.

३.             डॉ अदिती गुप्ते : मास्टर ऑफ फिजिओथेरपी न्यूरो स्पेशॅलिटीमध्ये सर्वाधिक गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

४.             डॉ आर्यन शुक्ला : मास्टर ऑफ फिजिओथेरपी स्पोर्ट्स स्पेशॅलिटीमध्ये सर्वाधिक गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

५.             डॉ शामल चोपडे : कस्तुरबा गांधी गोल्ड मेडल फॉर पोस्ट ग्रॅज्युएट्स हे पदक मिळवले. त्याचप्रमाणे मुसकलोस्केलेटल फिजिओथेरफीमध्ये प्रथम क्रमांक; प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित

६.             डॉ ऋचा अग्निहोत्री : न्यूरो फिजिओथेरफीमध्ये प्रथम क्रमांक; प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित

७.             डॉ रिमा आठवले : कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरफीमध्ये प्रथम क्रमांक; प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित

८.             डॉ भक्ती घोळकर : कम्युनिटी फिजिओथेरफीमध्ये प्रथम क्रमांक; प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित

९.             डॉ कोमल संगानी : स्पोर्ट्स फिजिओथेरफीमध्ये क्रमांक; प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page