२० मार्च रोजी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ २० मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा डॉ शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्र-कुलगुरू डॉ विश्वजीत कदम, कुलसचिव जी जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ अँथनी रोज उपस्थित राहणार आहेत. या पदवी प्रदान समारंभात ५८५८ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ५६ विद्यार्थ्यांना पीएच डी ही पदवी आणि ४५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११.५५ वा. भारती विद्यापीठाच्या पुणे-सातारा रोड येथील शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ विवेक सावजी यांनी दिली.
डॉ सावजी म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळीच या विद्यापीठाचे विश्वविद्यालयात रूपांतर करण्याचे स्वप्न डॉ पतंगराव कदम यांनी पाहिले होते. ते १९९६ साली प्रत्यक्षात उतरले. भारती विद्यापीठाला भारत सरकारने अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा दिला. गेल्या २८ वर्षांत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने गुणवत्तेच्या बळावर देदीप्यमान कामगिरी करून नामांकित विश्वविद्यालय म्हणून लौकिक मिळवला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ए-ग्रेड युनिर्व्हसिटी म्हणून उमटवलेली मोहर, नॅकने मूल्यांकनात आणि पुनर्मूल्यांकनात दिलेला अ+ दर्जा, एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांनी मिळविलेले मानांकन या गोष्टी विश्वविद्यालयाच्या नाव लौकिकात मानाचा तुरा खोवणार्या आहेत. भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच भारती विद्यापीठाच्या कार्याची खरी पावती आहे.