डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’च्या उदघाटनाला राज्यपाल येणार
कुलपती रमेश बैस यांची कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली भेट
विद्यापीठाच्या कामकाजाबद्दल कुलपती समाधानी
छत्रपती संभाजीनगर,दि.२०: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित १९ व्या ‘इंद्रधनुष्य’ राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती महामहिम रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी कुलपती महोदयांची शुक्रवारी भेट घेऊन निमंत्रण दिले.
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी यंदाच्या इंद्रधनुष्य महोत्सवाचे यजमानपद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. येत्या ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान हा सोहळा होणार असून २४ विद्यापीठांचे १ हजार ६० कलावंत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. एकूण २९ कलाप्रकार सादर होणार आहेत. या महोत्सव संदर्भात मा कुलपती रमेश बैस यांची कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी शुक्रवारी (दि.२०) राजभवनात भेट घेऊन यजमानपद दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ यासह विद्यापीठात गेल्या चार वर्षात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम याबद्दल माहिती दिली. या भेटीत विद्यापीठाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याबद्दलची माहिती मा.कुलगुरु यांनी कुलपती यांना दिली. विद्यपीठाच्या प्रगतीबद्दल मा. कुलपती यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठास आपण नक्की भेट देऊ, असेही मा कुलपती म्हणाले. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत विद्यापीठांनी घेतलेला भूमिकेची दखल यावेळी त्यांनी घेतली . मा. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी इंद्रधनुष्य उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले तसेच विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवालही सादर केला. कुलपती महोदय यांनी यास तात्काळ संमतीही दिली. गेल्या वर्षात राज्य क्रीडा महोत्सव, अखिल भारतीय वाणिज्य परिषद तसेच पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद घेण्यात आली. १९ व्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाही अत्यंत नियोजनबध्द व दिमाखदार असा हा सोहळा घेऊ, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी म्हणाले.
आजपासून ऑनलाईन नोंदणी
दरम्यान, येत्या ५ ते ९ नोव्हेंबर या काळात इंद्रधनुष्य आंतर विद्यापीठ महोत्सव विद्यापीठात होणार आहे. या महोत्सवासाठी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठित करुन काम सुरु करण्यात आले आहे. या सोहळ्यात २४ विद्यापीठे सहभागी होणार असून २१ ते ३१ नोव्हेम्बर दरम्यान संघांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे , अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ मुस्तजीब खान यांनी दिली.