भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती जाहीर
पुणे दि.२३ : भारतीय कला आणि कलाकारांसाठी काम करणाऱ्या भारत सरकारच्या संस्थांपैकी ‘सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र’ (सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग) ही एक अग्रगण्य संस्था आहे. भारतीय कलांमधील शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य तसेच नाट्य, लोकनाट्य, लोककला अशा विविध कलाक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवा कलाकारांसाठी ही संस्था दरवर्षी शिष्यवृत्ती देत असते. या संस्थेच्या वतीने भारतभरातून सुमारे चारशे विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे गायन, स्वरवाद्य, तालवाद्य, कथक, भरतनाट्यम, शास्त्रीय या विषयांतील बावीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत तर विद्यार्थ्यांच्या उत्तम दर्जामुळे तीन माजी विद्यार्थ्यांनाही ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे अशी माहिती संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली.
भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् हे आज भारतातील संगीत व नृत्य विषयातील गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे एक अग्रगण्य महाविद्यालय ठरले आहे. विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम कला प्रदर्शनासाठी कायम प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी कलामंच उपलब्ध करून देणे, प्रसंगानुरूप मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या महाविद्यालय नेहमीच निष्ठेने पार पाडत असते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी व संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.