गोंडवाना विद्यापीठाच्या STRC कडून जिल्ह्यात ग्रामस्तरावरील तंत्रज्ञान उपक्रमास प्रारंभ
शेतकरी, युवक व महिलांसाठी कमी खर्चिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकासाचा नवा उपक्रम
गडचिरोली (प्रतिनिधी): गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (Science and Technology Resource Centre – STRC) यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी, युवक व महिलांसाठी उपयुक्त, भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत तसेच कमी खर्चिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकासासाठी नव्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान, भारत (National Innovation Foundation – India) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
STRC कडून जिल्ह्यातील स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून ओळख करण्यात आलेल्या सात कमी खर्चिक तंत्रज्ञानांचे प्रस्ताव राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत यांच्याकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांना करारनामा अंतर्गत मंजुरी देण्यात आली असून संबंधित तंत्रज्ञान STRC कडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, युवक व महिलांना तंत्रज्ञानाधारित रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उपक्रमाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून मल्टीफूड प्रोसेसिंग युनिट व मल्टी ट्री क्लाइंबर या तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. तसेच निवडक समुदाय सदस्यांना प्रत्यक्ष (Hands-on) प्रशिक्षण देण्यात आले.
मल्टी ट्री क्लाइंबरच्या प्रात्यक्षिकासाठी कोंदावाही (ता. धानोरा) या गावाची निवड करण्यात आली होती. या वेळी कोयंबतूर येथील नवोन्मेषक श्री. श्रीवर्धन यांनी उपस्थित राहून तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकास ताडी/ताड काढणारे स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मल्टीफूड प्रोसेसिंग युनिट अंतर्गत विविध फळांपासून ज्यूस, जॅम, जेली, केचप, साबण व जेल आदी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक STRC च्या परिसरात घेण्यात आले. यावेळी संबंधित समुदाय सदस्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
याव्यतिरिक्त कापूस वात बनविण्याचे यंत्र, मल्टी कमोडिटी ग्राइंडर, पानांपासून ताटे व वाट्या बनविण्याचे यंत्र, मका सोलणारे यंत्र तसेच बांबू पट्टी व रॉड बनविण्याचे यंत्र ही तंत्रज्ञाने येत्या महिन्यात प्रात्यक्षिक व प्रशिक्षणासाठी सादर करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघुउद्योग व स्वयंरोजगारास चालना, शेती उत्पादन प्रक्रियेत वेळ व खर्चाची बचत, स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादन तसेच ग्रामस्तरावर उद्योगविकास साध्य होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तसेच कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. उपक्रमांची अंमलबजावणी STRC चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख श्री. स्वप्निल गिराडे यांच्या नेतृत्वाखाली STRC मधील वैज्ञानिक अधिकारी व त्यांच्या चमूच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
