गोंडवाना विद्यापीठाचा संघ अविष्कारसाठी रवाना
गडचिरोली : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) येथे ता 12 ते ता 15 जानेवारीदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार महोत्सवासाठी गोंडवाना विद्यापीठाचा संघ रवाना झाला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांनी झेंडा दाखवून संघाला रवाना केले.
यावेळी ननवसाचे संचालक डॉ मनीष उत्तरवार, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ प्रिया गेडाम, संघ नायक प्रा नंदकिशोर मेश्राम, संघ नायिका प्राची गुरमुडे व विद्यार्थी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ता. 3 व 4 जानेवारी रोजी विद्यापीठस्तरीय संशोधन उत्सव ‘अविष्कार 2024-25’ घेण्यात आला. या स्पर्धेमधील सहा गटातील विजेते राज्यस्तरीय महोत्सवासाठी निवडण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ प्रिया गेडाम यांनी दिली. संघाने महोत्सवामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्राविण्य प्राप्त करावे अशा कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे यांनी शुभेच्छा दिल्या.
अविष्कार ही स्पर्धा राजभवन कार्यालयातून 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देऊन त्यांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी शिष्यवृत्तीचादेखील समावेश आहे. राज्यातील एकूण 23 विद्यापीठांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे.