राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठामध्ये विविध स्पर्धा व व्याख्यान संपन्न
190 विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धा आणि व्याख्यानाचा लाभ
गडचिरोली : विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी व प्रगतीचा उद्देश ठेवून विविध स्पर्धा व वैज्ञानिकांच्या व्याख्यानाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे करण्यात आले. औचित्य होते राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे.
कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, नीरी संस्थेचे (नागपूर) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.नितीन लाभशेटवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, प्रा. डॉ. सुरेश चोपणे, प्रा. डॉ. लेपसे, वित्त व लेखा अधिकारी भास्कर पाठारे, डॉ. कृष्णा कारु, गणित विषयाचे प्रमुख डॉ. सुनील बागडे, डॉ प्रशांत ठाकरे, डॉ. स्नेहा वनकर, प्रा.कागे, प्रा. चेपटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातंर्गत महाविद्यालये व नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 190 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा आणि व्याख्यानाचा लाभ घेतला. नीरी संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. नितीन लाभशेटवार यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगाचा लाभ उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांवर असल्याचे व्याख्यानातून स्पष्ट केले. प्रास्ताविकेत बोलतांना समन्वयक डॉ. कृष्णा कारु यांनी विज्ञानाचे महत्व आणि उद्देश स्पष्ट केले. तसेच मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ चंद्रमौली यांनी डॉ सी व्ही रमन यांच्या रमन इफेक्टबद्दल विचार व्यक्त करतांना, विज्ञान हेच आपणास प्रगतीपथावर नेण्याचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले.
गोंडवाना विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात मॉडेल प्रदर्शनी, पोस्टर सादरीकरण आणि विज्ञान विषयावर आधारीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन रसायन शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. सुषमा बनकर यांनी मानले.