देशभक्ती आणि महापुरुषांच्या गौरव गीतांनी बहरला गोंडवाना विद्यापीठाचा परिसर
गडचिरोली : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सदाबहार तसेच देशभक्ती आणि महापुरुषांच्या गौरव गीतांनी गोंडवाना विद्यापीठाचा परिसर बहरून गेला. निमित्त होते अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे. गोंडवाना विद्यापीठ व सलंग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू आहेत. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम, प्रामुख्याने उपस्थित होते.


महोत्सवामध्ये एकल आणि सामुहिक गीत गायन स्पर्धा झाल्या. यामध्ये विद्यापीठातील तसेच विद्यापीठाच्या सलंग्नित चिंतामणी महाविद्यालय, पोंभूर्णा, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा, महात्मा गांधी महाविद्यालय, गडचांदूर तसेच एस. आर.एम. समाजकार्य महाविद्यालय, जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गीत गायन करून उपस्थित सर्वांची मने जिंकली. एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालयाने सादर केलेल्या साईबाबांवरील गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गीत गायन स्पर्धेपूर्वी दुपारी महिलांच्या रस्सखेच, खो-खो, संगीत खुर्ची तर पुरुषांच्या व्हॉली बॉल या स्पर्धा पार पडल्या.