जीएमसी कॉन्फरन्स २०२६ मध्ये देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज च्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश
अनुष्का थॉमस हिला ‘बेस्ट डेलीगेट’ पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर |
देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज (DIEMS), छत्रपती संभाजीनगर येथील कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थिनी अनुष्का थॉमस हिने जीएमसी कॉन्फरन्स २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकासह ‘बेस्ट डेलीगेट’ पुरस्कार पटकावला आहे.
दि. १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, छत्रपती संभाजीनगर (GECA) येथे आयोजित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मॉडेल युनायटेड नेशन्स (GMC Conference) च्या तिसऱ्या आवृत्तीत राज्यभरातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

UNSC-CCC समितीत रशियाचे प्रभावी प्रतिनिधित्व
या परिषदेत मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN) अंतर्गत अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या UNSC-CCC (United Nations Security Council – Crisis Control Committee) मध्ये अनुष्का थॉमस हिने रशिया देशाचे प्रतिनिधित्व केले.
अण्वस्त्र प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पूर्वहल्ल्याच्या लष्करी कारवाईची वैधता हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. यामध्ये रशियाच्या युक्रेनमधील विशेष लष्करी मोहिमेवर आधारित आंतरराष्ट्रीय कायदा, मुत्सद्देगिरी आणि धोरणात्मक विश्लेषण अनुष्काने प्रभावीपणे सादर केले.
रणनीतिक विचारसरणीने परीक्षक प्रभावित
पश्चिमी राष्ट्रांच्या पूर्वहल्ल्यांच्या धोरणांवर तिने ठाम भूमिका मांडत नागरी नागरिकांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी अधोरेखित केली.
तसेच अणु प्रतिरोधक धोरणामुळे जागतिक स्थैर्य कसे टिकू शकते याचे सखोल विश्लेषण सादर करत मोठ्या प्रमाणावर होणारे युद्ध टाळण्यासाठी अणु प्रतिरोधकता आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
संकट व्यवस्थापन, तात्काळ निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी आणि प्रभावी संवादशैली यामुळे परीक्षक व प्रतिनिधी प्रभावित झाले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अनुष्का थॉमस हिने बेस्ट डेलीगेट पुरस्कारासह ₹१२,००० रोख पारितोषिक पटकावले.
संस्थेचे अभिनंदन
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष व्ही. लहाने यांनी अनुष्का थॉमस हिचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या शैक्षणिक व बौद्धिक प्रगतीसाठी संस्थेचा सातत्यपूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली.
तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळुंके, सचिव मा. आ. श्री. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष श्री. शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष श्री. किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य श्री. विश्वास येळीकर, श्री. प्रदीप चव्हाण यांनीही अभिनंदन केले.
या यशात ओम बडवे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले.