सोलापूर विद्यापीठातील अंतिम वर्षातील 266 मुलींना मिळाले ‘प्लेसमेंट’चे ट्रेनिंग
पुणे-मुंबईतील तज्ज्ञांकडून पाच दिवस मिळाले प्रशिक्षण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील 266 विद्यार्थिनींना प्लेसमेंटचे ट्रेनिंग देण्यात आले. पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी पाच दिवस या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेतली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी मिळावी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी प्लेसमेंट व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली आहे. रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अनिल घनवट यांच्याकडे या सेंटरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील 266 विद्यार्थिनींना विविध उद्योग समूह व कंपन्यांमध्ये नोकरीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व कशा रीतीने सामोरे जावे, याविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर, व्यक्तिमत्व विकास, गटचर्चा, व्यवसायिक नीतीशास्त्र, रोजगार कौशल्य, वेळेचे व पैशाचे व्यवस्थापन, मुलाखत तंत्र, सादरीकरण तंत्र, नवीन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी तज्ञांनी प्रशिक्षण दिले.
महिंद्रा प्राइड क्लासरूम अंतर्गत नांदी फाउंडेशनच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबिर पार पडले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेंटरचे डॉ. अनिल घनवट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये मंजिरी हिरमुखे, शिल्पा खुने, स्वस्ती खंडागळे, कीर्ती गाडे या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. तसेच नांदी फाउंडेशनचे पंकज दांडगे व सीमा भागवत यांचे यासाठी सहकार्य लाभले. कुलसचिव योगिनी घारे व संगणकशास्त्र संकुलातील डॉ. राजीवकुमार मेंते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना कुलसचिव घारे म्हणाल्या की, मुलींनी चांगले उच्च शिक्षण घेऊन उज्वल करिअर घडवण्यासाठी लक्ष द्यावे. मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जावे. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, याची जाणीव कायम मनात ठेवून वाटचाल करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रशिक्षणामुळे मुलाखतीस सामोरे जाताना तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी खूप फायदा होणार असल्याचे मत उर्वी पटेल, ज्योत्सना मदानी, रश्मी मोहोळकर, कांचन निकंबे, चरिता जवळकोटे, अश्विनी मेनकुदळे, रेणुका गाडेकर, तेजश्री ताटे, अबोली जमदाडे, अमृता स्वामी या विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहणार – कुलगुरू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना चांगले उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या प्लेसमेंटसाठी देखील विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले आहे. यासाठी कॅम्पसमधील विद्यार्थिनींना पहिला टप्प्यात प्लेसमेंटविषयी प्रशिक्षण देण्यात आले. संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सोय करण्यात येणार आहे. जेणेकरून रोजगाराभिमुख पिढी घडवण्यासाठी विद्यापीठ काम करणार असल्याचेही कुलगुरू प्रा. महानवर यांनी म्हटले आहे.