देवगिरी महाविद्यालयात ‘लिंगविषयक संवेदनशीलता : जाणीव जागृती’ कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयातील अंतर्गत समितीच्या वतीने दिनांक २६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या दरम्यान ‘लिंगविषयक संवेदनशीलता : जाणीव जागृती’ कार्यक्रम संपन्न झाला. अंतर्गत समितीचे कार्य, कायद्याप्रमाणे तिची असणारी रचना, लैंगिक छळ म्हणजे काय, त्या विरोधी असणारे विविध कायदे याविषयीचे मार्गदर्शन तसेच लैंगिक छळासारख्या घटना घडू नये’ त्यास प्रतिबंध बसावा यासाठी महाविद्यालयाने, विविध ठिकाणी अंतर्गत समितीचे लावलेले बोर्ड, सजेशन बॉक्स, गोपनीय पद्धतीने तक्रार दाखल करावयाची असल्यास स्वतंत्र मेल आयडी, एनजीओ मेंबरची नेमणूक अशा प्रकारे जी काही खबरदारी घेतली आहे त्याबद्दलची माहिती प्रत्येक विद्या शाखेच्या वर्गावर्गात जाऊन दिली.
विद्यार्थ्यांमध्ये परस्पराबद्दल आदरभाव जागृत व्हावा, भिन्नलिंगी व्यक्ती बदल सन्मान जागृत ठेवून सदैव जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडावी याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक कर्मचारी, सफाई कर्मचारी अशा सर्व घटकांपर्यंत देखील या समितीचे कार्य आणि समितीची जबाबदारी याबद्दलची माहिती पोहोचवली. विद्यार्थी वस्तीगृह, विद्यार्थिनी वस्तीगृह, कॅन्टीन, मेस आदी ठिकाणी देखील समितीने प्रत्यक्ष जाऊन सुरक्षेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हा संपूर्ण सप्ताह देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती प्रमुख डॉ समिता जाधव, समिती सदस्य डॉ अतुल पवार, डॉ ज्ञानेश्वर जिगे, प्रा मीनाक्षी धुमाळ, डॉ मनीषा पाटील आणि एनजीओ प्रतिनिधी कल्याणी नागोरे यांनी प्रयत्न केले.