आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जीन हेल्थ लॅबकरीता सी एस आर फंडातून निधी प्राप्त
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून निधी प्राप्त
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील जीन हेल्थ लॅबकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांनी सांगितले की, समाजातील आर्थिकदृष्टया वंचीत रुग्णांना जनुकीय आणि अनुवांशिक चाचणी आदी जनुकीयबाबींशी निगडीत आरोग्य समस्यांचे चाचणी अत्यल्प खर्चात करता यावी यासाठी जीन हेल्थ लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबकरीता नवीन उपकरण खरेदीसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून मिळालेला निधीमुळे आर्थिक पाठबळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, अनुवांशिक विकारांचे निदान करण्यासाठी जीनोमिक आणि अनुवांशिक चाचण्या करण्यात येतात. यामध्ये डाऊन्स सिंड्रोम, थॅलेसेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकलसेल अॅनिमिया कर्करोगाशी संबंधित आजारात फुफ्फुस, स्तन, रक्ताचा ल्युकेमिया आदी आजारात जनुकीय चाचण्या करणे अनिवार्य असते. गरीब रुग्णांना कमी खर्चात जनुकिय चाचण्या करता याव्यात यासाठी लॅबची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांना उपचार, रुग्णालयात दाखल होण्याचा समावेश आहे या अनुषंगाने जनुकिय आजाराच्या चाचण्यांकरीता तातडीने गरीब रुग्णांना सेवा देता यावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील शिवाजी नगर परिसरात डॉ घारपुरे बंगल्यात उभारण्यात आलेल्या ‘जीन हेल्थ्य लॅब’ मध्ये मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल, पुण्याचे ससून हॉस्पिटल आदी रुग्णालयांमधील अनेक शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध डॉक्टर रुग्णांना मदत व समुपदेशनासाठी सेवा देतात.
राज्यातील अन्य भागातील रुग्णांचे जनुकिय चाचण्यांसाठी नमुने संकलित करुन पुणे येथे आणण्यासाठी कुरिअर कोल्ड-चेन लॉजिस्टिक कंपन्यांशी करार करण्यात येणार आहे, जेणेकरुन जनुकिय चाचण्या कमी वेळात पुणे येथील केंद्रीय जीनहेल्थ लॅबमध्ये आणणे शक्य होईल. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांसाठी खाजगी संस्था व कंपन्याकडून सीएसआर फंडातून मोठया प्रमाणात निधी मिळावा याकरीता दत्ता नाडकर्णी परिश्रम घेत आहेत. विद्यापीठाचे पुणे विभागीय कार्यालयातील चेअर प्रोफेसर ऑफ कॅन्सर जेनेटिक रिसर्चच्या डॉ अनुराधा चौगुले यांच्या मार्गदर्शनात जीन हेल्थ लॅबचे कामकाज सुरु आहे.