दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थाद्वारे मोफत आरोग्य सेवा महाशिबिराचे आयोजन
वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे वर्धा सोशल फोरम आणि लोक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने आरोग्य संकल्प अभियानांतर्गत मोफत आरोग्य सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, आमदार समीर मेघे, लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महामंत्री जयंत कावळे, अविनाश देव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, पुलगाव येथील सीएडी कॅम्पचे ब्रिगेडियर कौशलेष पांघाल यांच्यासह अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा रोग, श्वसनरोग, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, मानसोपचार, त्वचारोग, दंतरोग व मौखिक आजार या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णतपासणी, निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार निःशुल्क करण्यात येणार आहे. शिबिरातून उपचारांकरिता सावंगी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची जाण्यायेण्याची तसेच निवास व भोजनाची व्यवस्था वर्धा सोशल फोरमद्वारे केली जाईल. याशिवाय सोनोग्राफी, एमआरआय, एक्सरे, रक्त व लघवी तपासणीसह सर्वसामान्य चाचण्या मोफत करण्यात येतील. प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ रुग्णांना करून दिला जाणार आहे. या विशेष आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे व रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी केले आहे.