लवचिकता हाच नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा : प्रो. श्याम शिरसाठ
औरंगाबाद : येथील विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : है तयार हम” या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रो. श्याम शिरसाठ यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अक्षयभाऊ शिसोदे, सचिव डॉ. यशोद पाटील, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर. शेंगुळें, संचालक डॉ अशोक गायकवाड यांची उपस्थिती होती.
आपल्या वक्तव्यात डॉ. शिरसाट म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अद्यापपर्यंत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यापर्यंत सविस्तर व अचूकपणे पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि या संभ्रमांच्या पार्श्वभूमीवर “है तयार हम” सारखे उपक्रम या धोरणाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ठरतात.आपल्या वक्तव्यात पुढे ते म्हणाले की आजवरच्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षणक्रमात मोठ्या प्रमाणावर आवश्यकतेनुसार परिवर्तन झाले मात्र यामध्ये मूलगामी सुधारणा नव्हत्या. तथापि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा मिलाफ करून त्याच्या परस्परपूरकतेचा विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी उपयोग कसा करता येईल यावर विचार करण्यात आलेला आहे. लवचिकता हा या धोरणाचा मूळ उद्देश असून विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिकच नाही तर एकूण व्यक्तिमत्व विकसित करणे यातून शक्य होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे जीवन किंवा व्यक्तीचे व्यक्तिमत्व बंदिस्त अथवा साचेबद्ध असू शकत नाही तद्वतच शिक्षणाला देखील मर्यादा असणे चुकीचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, सक्षम मूल्य व्यवस्था नि उद्यमशीलता या बाबींचा आवर्जून अंतर्भाव करण्यात आलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांनी अद्ययावत असणे आणि संस्थांनी सक्षम असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप करताना विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अक्षयभाऊ शिसोदे यांनी परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून त्यासाठी सदैव तयार राहण्यातच हित असल्याचे स्पष्ट केले. स्वातंत्र्याचा अमृतकाल चालू असताना देशाची वाटचाल कशी असावी हे ठरवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तत्पर राहावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा फिरके यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.