गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
गडचिरोली : ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त गोंडवाना विद्यापीठ परिसरात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कुलगुरू डॉ बोकारे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आपल्या प्रेरणादायी भाषणात, कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे म्हणाले, “15 ऑगस्ट हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताला कठोर संघर्ष केल्यानंतर वर्षानुवर्षे गुलामगिरीच्या साखळदंडातून स्वातंत्र्य मिळविता आले. हि स्वातंत्र्याची फळे आपणच नाही तर येणाऱ्या पिढ्या वर्षानुवर्षे चाखणार आहे. स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करुन देण्यासाठी सद्यस्थितीत देशातील शिक्षण क्षेत्रात काही महत्वपुर्ण गोष्टी करण्याची आवश्यकता असल्याचे कुलगुरु डॉ बोकारे यांनी स्पष्ट केले.
त्यांचेनुसार, आजच्या घडीला असर-2023 अहवालानुसार 55 टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना लिहीता वाचता येत नाही. याअनुषंगाने, विद्यापीठाच्या पुढाकाराने स्थानिक शाळांना दत्तक घेवून अशा विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. याकरीता, जिल्हा परीषद शिक्षण विभागासमवेत सांमजस्य करार करुन जिल्हयातील 10 ते 15 शाळा प्राथमिक स्वरुपात दत्तक घेण्यात येईल. जेणेकरुन, आपल्या पुढील पिढीला स्वातत्र्यांचा लाभ घेण्याकरीता साक्षरता प्रदान करण्यात येईल, असेही कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे म्हणाले.
यावेळी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन, रा से यो संचालक डॉ शाम खंडारे, न न व सा संचालक डॉ मनिष उत्तरवार, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दिनेश नरोटे, वित्त व लेखा अधिकारी, भास्कर पठारे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ धनराज पाटील तसेच विद्यापीठातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.