अमरावती विद्यापीठात नवनियुक्त कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन विद्यापीठात उत्साहात साजरा
जास्तीत जास्त स्किल देणारे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करणार – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती : विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी जास्तीत जास्त स्किल देणारे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु केले जातील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून राष्ट्रगीत गायिले.
कुलगुरू डॉ. बारहाते पुढे म्हणाले, नॅकमध्ये विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला होता, परंतु कोरोना काळात विद्यापीठाच्या झालेल्या मूल्यांकनामध्ये तो किंचितसा खाली घसरला. परंतु येणा-या नॅक मूल्यांकनामध्ये आपला दर्जा आपण निश्चितपणे वाढवू. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पदव्युत्तर स्तरावर आपण लागू केले आहे. पदवी स्तरावर 2024-26 यावर्षीपासून लागू होईल. याशिवाय या धोरणाचे महत्व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसह शालेय विद्याथ्र्यांपर्यंत पोहचावे, याकरीता स्कूल कनेक्ट कार्यक्रम आपण राबवित आहोत.
भविष्यात जास्तीतजास्त स्किल देणारे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु होतील. उद्योजकांना लागणारे मनुष्यबळ आपल्या अभ्यासक्रमातून तयार होईल. विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळेल, याकरीताच स्किल अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रात आदिवासीबहुल मेळघाट तसेच यवतमाळ आहे. तेथील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी मला आणखी वाढवायच्या असून आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा, समाजासाठी नवनिर्माण करण्याकरीता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्य देण्यावर माझा भर असणार आहे. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने या विद्यापीठाची वाटचाल अग्रेसर आहे.
नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यापीठाने सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे, याकरीता विविध कार्यशाळेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यामध्ये विद्यापीठ अग्रेसर आहे. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाद्वारे विद्यार्थ्यांकरीता इंटर्नशिप याशिवाय त्यांच्यामध्ये संशोधन दृष्टीकोन निर्माण करुन उद्योन्मुख संशोधक तसेच स्वत:चा उद्योग सुरु करण्याकरीता आवश्यक स्कील, स्टार्टअप आदींवर सातत्याने भर दिल्या जात आहे. नाशिक येथे झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदके मिळविली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली असून यापुढेही ते विद्यापीठाचा नावलौकीक करुन यशोशिखरावर पोहचवतील असा विश्वास दर्शवून कुलगुरूंनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी केले. ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सदस्य, संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.