डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत आराखडा अधिसभेत मंजूर
८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमास मान्यता
चार जिल्हयासाठी ६६० नवीन कोर्सेस
‘विद्यापीठ कॅम्पस’साठी ४० कोर्सेस प्रस्तावित
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत आगामी पंचवार्षिक बृहत आराखडयास सर्वानुमते मंजूर देण्यात आली. चार जिल्हयात मिळून सुमार ६६६ नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित असून ८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. महात्मा फुले सभागृहात मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि.२६ सकाळी ११ः३० वाजता अधिसभेची बैठक सुरु करण्यात आली. प्रारंभी नवनियुक्त अधिसभा सदस्य किशोर शितोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तर यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी २०२४-२५ ते २०२८-२९ हा पंचवार्षिक बृहत आराखडा मंजूरीपर्यंत राबविण्यात आलेली संपुर्ण प्रक्रिया विशद केली. या आराखडीसाठी सर्वेक्षण करण्यात आले तसेच राज्यशासनाने ऑनलाईन प्रस्तावही मागविले. यासाठी ५९४ प्रस्ताव ‘स्टेक होल्डर्स’ यांनी पाठविले. परंपररागत अभ्यासक्रमापेक्षाही व्यावसायिक, कौशल्यावर आधारित कोर्सेस बृहत आराखडयात मांडण्यात आले. चार विद्याशार्खेगत जवळपास ६६० अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद १९४, जालना – १५२, बीड-१७४ व उस्मानाबाद जिल्हयासाठी १४० अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे.
‘विद्यापीठ कॅम्पस’मध्ये ४० कोर्सेस
विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी मिळून जवळपास ४० अभ्यासक्रम यामध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये जैवतंत्रज्ञान, फॅशन डिझाईन, शैक्षणिक व्यवस्थापन, उद्योजकता विकास, रोबोटिक सायन्स, जिम ट्रेनिंग अॅण्ड हेल्थ मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, स्पेस टेक्नॉलॉजी, पर्यटन प्रशासन आदी विषयाचा समावेश आहे.
कुलगुरुंनी लावली शिस्त : अभिनंदनाचा ठराव
कुलगुरूंनी गेल्या चार वर्षा मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मध्ये विद्यार्थी व विद्यापीठाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतलेत, विद्यापीठा मध्ये प्रशासकीय तसेच आर्थिक शिस्त आणली, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे विद्यापीठाच्या नावलौकीक राष्ट्रिय स्तरावर वाढविला त्या बद्धल विद्यापीठाच्या आज झालेल्या बैठकी मधे कुलगुरूंचे अभिनंदन करुन त्याना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणुन एक आणखी टर्म वाढ देण्यात यावी अशी विनंती राज्यपाल महोदय व महाराष्ट्र शासनास करावी अश्या प्रकारचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेने एक मताने पारित केला. कोणत्याही विद्यापीठामध्ये कुलगुरूंना मुदतवाढ देवून वाढीव टर्म देण्यात द्यावी अश्या प्रकारचा ठराव पहिल्यांदाच पारीत झाला असावा. गेल्या चार वर्षात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी शैक्षणिक, प्रशासकीय शिस्त आणली याबद्दल अधिसभा सदस्यांनी एकमताने अभिनंदनाचा ठराव मांडला. डॉ.शंकर अंभोरे, प्रा.सुनील मगरे, डॉ.उमाकांत राठोड, किशोर शितोळे, गोविंद देशमुख, प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे, डॉ.मुंजाबा धोंडगे आदी सदस्यांनी ठरावाला अनुमोदन दिले. अत्यंत कमी दराने ‘लिज’वर दिलेली विद्यापीठाची जागा परत घ्यावी तसेच आगामी काळात विद्यापीठाची जागा देऊ नये अशी भावनाही डॉ.अंभोरे व सहकारी यांनी मांडली.
मराठवाडयाने खुप प्रेम दिले : कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणा-या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली. मराठवाडयातील जनतेने खुप प्रेम दिले. कुलगुरु यांना मुदत वाढ द्या, असा ठराव घेणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे. कुलगुरू पदाच्या गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात विद्यापीठाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. सर्व प्राधीकरणासचे यास सहकार्य मिळाले. नवीन शैक्षणिक धोरण व बदलत्या काळानूसार विद्यापीठाला पुढे नेऊ, असा विश्वास मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.