विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकाच्या प्रसंगावधानामुळे आग विझविण्यात यश
जळगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग साक्री येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाने प्रसंगावधान राखत केल्यामुळे एस टी बसच्या इंजिनला लागलेली आग विझविण्यात यश मिळाले.
साक्रीच्या विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचा स्वयंसेवक सागर पवार याने हे प्रसंगावधान राखले. नंदुरबार ते नाशिक ही बस प्रवाशी घेवून साक्री तालुक्याती छडवेल कोर्डे येथून जात होती. त्याचवेळी बसच्या इंजिनमध्ये आग लागली. प्रवासी घाईगडबडीत उतरत असलेले सागर पवारने पाहिले. इंजिनमध्ये लागलेली आग पाहून त्याने तातडीने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली आणि जवळच्या पेट्रोलपंपावर जाऊन अग्नीशामक यंत्र आणून बसमधील आग विझवली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सागर हा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झालेल्या राज्यपातळवरील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून सहभागी झाला होता. या शिबीरात आग विझविण्याचे धडे त्याने घेतले होते ते प्रत्यक्ष कामात आले.