‘पेट’साठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर

११ हजार ४४८ विद्यार्थी पेट देणार

१ हजार ९९८ जणांना ‘एक्झमशन’

शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ६७९ जण अपात्र

३ ऑक्टोबरला ११ केंद्रांवर चाचणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पीएच डी एन्ट्रेन्स टेस्टसाठी (पेट-२०२४) ११ हजार ४४८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर दोन वेळा संधी देऊनही मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे ६७९ जण अपात्र ठरले आहेत.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पी एच डी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया (पेट – २०२४) राबविण्यात येत आहे. जुन अखेरीस ‘पेट’चे वेळापत्रक घोषित करण्यात आले. १ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘समर्थ पोर्टल’ द्वारे ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या दरम्यान १७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात अर्जातील त्रुटी संबंधित विद्यार्थ्यांना कळवून पूर्ततेची संधी देण्यात आली. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून १० सप्टेंबरला प्राथमिक यादी (Provisional List) प्रकाशित करण्यात आली. यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी करून पूर्तता करण्याची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. यानंतर २१ सप्टेंबर रोजी पेटसाठी पात्र,अपात्र व एक्झमटेड विद्यार्थ्यांची अंतिम यादी घोषित करण्यात आली.

Advertisement

एकूण १४ हजार १२५ आवेदन प्राप्त झालेले आहेत. यामध्ये ११ हजार ४४८ विद्यार्थी हे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पेट साठी पात्र ठरले आहेत. १ हजार ९९८ विद्यार्थी हे पेटमधून एक्झमटेड आहेत. तर दोन वेळा संधी देऊन ही मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे ६७९ जण ‘पेट’साठी अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आदी कारणांमुळे कोणाचाही अर्ज अपात्र ठरविण्यात आलेला नाही तर पदवीधर पदवीची गुणपत्रिका न जोडणे, निकाल पूर्ण नसणे, संबंधित विषय सोडून दुसऱ्या विषयात अर्ज करणे आदी कारणांमुळे हे विद्यार्थी पेट चाचणी देण्यास अपात्र ठरले आहेत. संबंधित विभागात अर्जांची छाननी करण्यात आली.

पेट सेल व युनिकच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे अधिष्ठाता मंडळाचे अध्यक्ष प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पेटची सविस्तर नियमावली तयार करून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. ’पेट’साठी चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ महेंद्र शिरसाठ, डॉ संजय साळुंके, डॉ वैशाली खापर्डे, डॉ वीना हुंबे, संचालक डॉ भालचंद्र वायकर तसेच परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ भारती गवळी, युनिटचे संचालक डॉ प्रवीण यन्नावार आदींसह सहकारी प्रयत्नशील आहेत. एकूण ४४ विषयांसाठी ही चाचणी होणार असून यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य या शाखांचा समावेश आहे.

चार विद्याशाखेअंतरागत ४४ विषयांसाठी पेट होत असून ऐकून ४९७ संशोधकांकडे आजघडीला १ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. प्रवेशपूर्व प्रक्रिया ’ऑनलाईन’ पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तर येत्या ३ ऑक्टोबर रोजी चार जिल्ह्यातील ११ केंद्रांवर ही चाचणी ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्यात येणार आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना पेट पोर्टलवर वेळोवेळी माहिती अपडेट करण्यात येईल, असे पेट सेलच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page