एमजीएम विद्यापीठाच्या ‘पाचोळा’ कादंबरीवर आधारित चित्रपटाची हरियाणा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

छत्रपती संभाजीनगर : प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरीचे माध्यमांतर असलेला ‘पाचोळा कादंबरीवर आधारित’ या चित्रपटाची हरियाणा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. कुठलीही व्यावसायिक अथवा तांत्रिक मदत न घेता मराठवाड्यात संपूर्ण लांबीच्या चित्रपटाची निर्मिती व्हावी हे एक स्वप्न होते. एमजीएम विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म आर्ट्सच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी मिळून हि निर्मिती साध्य केली. आज अनेक महोत्सवात या चित्रपटाची निवड होणे, तो चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस पडणे हे उत्साह वाढवणारे आहे, असे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले. अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रतिभासंपन्न मार्गदर्शक एमजीएमच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्समध्ये उपलब्ध असल्याकारणाने विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांना योग्यप्रकारे न्याय देता येतो. हरियाणा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पाचोळाची निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून आणखी जोमाने विद्यार्थी आपले उत्कृष्ट देऊन फिल्म क्षेत्रात कार्यरत राहतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

चित्रपट निर्मिती ही खर्चिक प्रक्रिया असल्यामुळे अभिजात साहित्याचे चित्रपटात माध्यमांतर करताना अनेक मर्यादा येतात. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणे आर्थिकदृष्ट्या गरजेचे असल्यामुळे दिग्दर्शकाला कथा आणि कथेच्या सादरीकरणाबरोबर अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एमजीएम विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म आर्टस्मध्ये उपलब्ध सुविधा आणि एमजीएम प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे ‘पाचोळा’ चे प्रामाणिक माध्यमांतर करता आले. अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवामध्ये ‘पाचोळा कादंबरीवर आधारित’ चित्रपटाची निवड होणे ही खूपच समाधानकारक बाब आहे, असे मत दिग्दर्शक आणि रूपांतरकार शिव कदम यांनी व्यक्त केले.

‘पाचोळा कादंबरीवर आधारित’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून जाई कदम, सुषमा शेळके, महेश हरबक, कल्याणी शिंदे, घनश्याम पवार, शुभम सोकतकर, आशुतोष जाधव, राहुल खरे, सतीश जोगदंड आणि चित्रपटाच्या टीमचे कौतुक होत आहे. या चित्रपटाला सगळीकडून सन्मानपूर्वक स्वीकृती मिळायला सुरुवात झालेली. ही निवड झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने विभागप्रमुख प्रा.शिव कदम आणि पाचोळा चित्रपटाच्या टीमचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर व अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page