‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन
विद्यापीठातील नाट्य व चित्रपट विभागाचा अभिनव अभ्यासक्रम
नांदेड :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ जानेवारी ते २८ मार्च २०२५ या कालावधीत तीन महिन्याच्या ‘चित्रपट अभिनय प्रशिक्षण’ अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया या चित्रपट निर्मीतीचे प्रशिक्षण देणा-या जागतिक पातळीवरील संस्थेशी विद्यापीठाने सामंजस्य करार केल्यानंतर चित्रपट निर्मीतीसंबंधी विविध विषयावर यापुर्वी जवळपास सहा अभ्यासक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे. याचा फायदा नांदेडसह मराठवाडा व परराज्यातील कलावंतांनाही झाला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्य व चित्रपट विभागाने दि. २२ जुलै ते १२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान तीन महिने कालावधीच्या चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. या अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील पुणे-मुंबई, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आदी परराज्यातील विद्यार्थी कलावंतांनी ‘स्वारातीम’ विद्यापीठात राहून अभिनयाचे धडे गिरवले होते. मागील अभ्यासक्रमाचा प्रतिसाद पाहता कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या सूचनेनुसार दुस-यांदा तीन महिने कालावधीच्या चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाचे आयोजन केले असून, आता चित्रपट अभिनय शिकण्याकरीता पुण्या-मुंबईला न जाता नांदेड येथेच देशभरातील विद्यार्थ्यांसह व जागतिक दर्जाच्या फिल्म इंन्स्टिट्युटच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. चित्रपट अभिनयाचे बारकावे शिकण्याची व त्यात करीअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे संकुलाचाचे संचालक डॅा. पृथ्वीराज तौर यांनी कळविले आहे.
सदरील अभ्यासक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना २३ डिसेंबर २०२४ पुर्वी आपले प्रवेश निश्चित करावे लागणार असून, अभ्यासक्रमासाठी मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इंन्स्टीट्युट ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सुरु आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा. राहुल गायकवाड (मो.९०४९०४३८९४) यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.