‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे

आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इंन्स्टीट्युट ऑफ इंडियातील तज्ञ करणार मार्गदर्शन

नांदेड : मनोरंजन क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारत चालले आहे. त्यानुसार नाटक, चित्रपट, लघुचित्रपट, मालिका, वेबसिरीज, जाहिरात आदी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित नट-कलावंतांची मागणीही वाढलेली आहे. भारतीय चित्रपट मोठ्या प्रमाणावर अंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशाचा डंका वाजवताना पहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विशेष करुन नांदेडच्या मातीतील कलावंतामध्ये प्रचंड उर्जा आणि कलागुण आहेत. गरज आहे ती शास्त्रशुध्द प्रशिक्षणाची आणि हिच गरज ओळखून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विषयाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणाऱ्या स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॅार्मिंग आर्टसने (नाट्य व चित्रपट विभाग) आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या चित्रपट निर्मीतीचे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेशी सामंजस्य करार केला.

SRTMU Nanded

भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्त असणाऱ्या या संस्थेने अतापर्यंत पूर्ण देशातील केवळ तीनच विद्यापीठांशी असा सामंजस्य करार केलेला असून स्वा.रा.ती.म.विद्यापीठ हे त्यापैकी एक आहे. या कराराअंतर्गत मागील शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॅार्मिंग आर्टसने (नाट्य व चित्रपट विभाग) चित्रपट रसास्वाद, स्क्रिन अॅक्टींग , स्मार्ट फोन फिल्म मेकिंग व पटकथा लेखन आदी जवळपास सहा चित्रपट निर्मीती विषयक लघु अभ्यासक्रम व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. ज्याचा नांदेड व परिसरातील कलावंतांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

Advertisement

विद्यापीठाचे कुलगुरू डॅा मनोहर चासकर यांनी मनोरंजन क्षेत्राची हीच गरज ओळखून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठात राबवण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा व नांदेड मधील कलावंतांच्या कलागुणांचा तंत्रशुध्द प्रशिक्षणाद्वारे विकास करण्याच्या उद्देशाने नांदेड मधेच विद्यापीठातील स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॅार्मिंग आर्टस (नाट्य व चित्रपट विभाग) येथे चित्रपट निर्मीती विषयक नवीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन अॅक्टींग (चित्रपट, मालिका अभिनय) व फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन प्ले रायटींग (पटकथा लेखन) या तीन महिने कालावधीच्या दोन नवीन अभ्यासक्रमांचे आयोजन केले आहे. फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या सहकार्याने चालणाऱ्या या अभ्यासक्रमात FTII चे तज्ञ मार्गदर्शन करणार असून, FTII च्या अधिकृत संकेस्थळावरुन या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पुणे-मुंबई सारख्या शहरांकडे न जाता विद्यापीठातील स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॅार्मिंग आर्टसचा नाट्य व चित्रपट विभाग नांदेडमध्येच एम.ए. थिएटर आर्टस अॅण्ड फिल्मस् या पदव्युत्तर व बि पी ए नाट्यशास्त्र (बॅचलर ऑफ परफॅार्मींग आर्टस) या पदवी अभ्यासक्रमाद्वारे मागील १४ वर्षापासून कलावंताना तंत्रशुध्द प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देत आहे. येथून प्रशिक्षित अनेक कलावंत नाटक, मालिका, चित्रपट, आकाशवाणी, युट्युब सारख्या विविध माध्यमात यश संपादन करत असल्याचे स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॅार्मिंग आर्टसचे संचालक डॅा पृथ्वीराज तौर यांनी सांगीतले. नव्याने सुरु होणाऱ्या फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन अॅक्टींग व फांउडेशन कोर्स इन स्किन प्ले राइटींग या अभ्यासक्रमांचा मराठवाड्यातील कलावंतानी लाभ घ्यावा व प्रवेशाकरीता तसेच अधिक माहितीसाठी नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा राहुल गायकवाड (९०४९०४३८९४) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संचालक डॅा पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page