अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची ‘मेळघाट हाट’ या उत्पादन विक्रीकेंद्राला क्षेत्रभेट
माविमच्या ‘मेळघाट हाट’ला विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरची क्षेत्रभेट
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एम ए जेंडर अँड वुमेन्स स्टडीज अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नैसर्गिक उत्पादनाचे माहेरघर असलेले ‘मेळघाट हाट’ या उत्पादन विक्रीकेंद्राला क्षेत्रभेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना आदिवासी महिला उद्योजकांच्या यशस्वी प्रकल्पांची भेट घडवून आणणे, त्यांचे कार्य जाणून घेणे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करणे या हेतूंनी ही क्षेत्रभेट देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण योजनेतील काही निधी हा मेळघाट क्षेत्रातील धारणी व चिखलदरा येथील एकूण साठ स्वयंसाहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने अमरावती येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद, अमरावती यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे केंद्र अलीकडेच स्थापन झाले. मेळघाट हाट या विक्री केंद्रात मेळघाट क्षेत्रातील तृणधान्य सावा, कुटकी, खपली, लाल तांदूळ, मोहा उत्पादने तसेच इतर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विक्री केंद्राचे स्वतःचे गोडावून व मशिनरी सुविधादेखील आहेत, अशी माहिती माविमचे सहायक नियंत्रक अधिकारी वैभव काळमेघ यांनी दीली.
यावेळी सेंटरमधील विद्यार्थ्यांसह प्रकल्प सहयोगी डॉ. मनीषा इंगळकर व प्रकल्प सहाय्यक डॉ. वैभव अर्मळ, कार्यालयीन सहाय्यक आरती घुईखेडकर, अभिलाष धाबे, पूजा अलोने, भाग्यश्री कांबळे उपस्थित होते.