पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक डॉ. मोना चिमोटे यांचा सत्कार
अमरावती : छत्रपती संभाजीनगर येथील मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १० डिसेंबर, २०२४ दरम्यान दुबई येथे होणा-या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख तथा मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी डॉ. मोना चिमोटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यापीठाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आदी उपस्थित होते.
साहित्य समीक्षक, संशोधक आणि लेखिका म्हणून डॉ. मोना चिमोटे यांची ओळख आहे. ‘रहस्यकथा या कथाप्रकाराचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील शोधप्रबंधासाठी डॉ. चिमोटे यांना अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्याचा समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्रकल्प पूर्ण केला असून त्यांना पोस्ट डॉक्टरल रिसर्च अवॉर्ड प्राप्त झाला आहे. याशिवाय ‘अनुवादीत विज्ञान कथात्म साहित्याचा मराठी विज्ञान कथात्म साहित्यावर झालेला प्रभाव’ या विषयावर त्यांनी विद्यीपीठ अनुदान आयोगाचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट ही पूर्ण केला आहे. कवी अज्ञात यांची स्वच्छंद, अनुकंपा, डोहवळ, स्नेहदग्ध, ओघळांचे नकाशे, अनन्यशर आणि ‘अज्ञातवास : एक काव्यखंड’ इत्यादी काव्यसंग्रहांचे संपादन त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या ‘पळसबंध’ या ललित लेखनसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असून हा संग्रह बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या बी. ए. भाग दोनच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या ‘कालखंडानुसार साहित्याभ्यास’ या पुस्तकाचा समावेश यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. डॉ. मोना चिमोटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.