संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप
कर्मचाऱ्यांचे समाधान हीच खरी कर्तव्याची पावती – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : सेवानिवृत्त होत असतांना विद्यापीठातील कर्मचारी समाधानी आहेत आणि हीच खरी त्यांच्या कर्तव्याची पावती आहे, असे उद्गार कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्य प सदस्य डॉ विद्या शर्मा, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी डॉ अनिल काळबांडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, सत्कारमूर्ती डॉ एस व्ही डुडुल, डुडुल, हिंमत बावने, बावने, दिपक वानखडे, वानखडे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती.
कितीही महत्वाचे काम असले, तरी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असे प्रण केल्याचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले. प्रत्येक कर्मचारी अतिशय मनाभावे आपले काम करतात. मनुष्यबळाची वाणवा असली, तरी सुध्दा गतिमानता आणि गुणवत्तेवर कोणताही परिणाम झाला नाही. डॉ संजय डुडुल यांचे विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये उल्लेखनीय कार्य आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी कार्य केले आहे. पीएच डी बाय स्टार्टअप हा उपक्रम नव्याने विद्यापीठात सुरू करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्तावही विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे कुलगुरूंनी यावेळी सांगितले.
यासाठी डॉ संजय डुडुल व डॉ अनंत मराठे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेखही कुलगुरूंनी केला. याप्रसंगी कुलगुरुंनी सत्कारमूर्तींना पुढील आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री एस व्ही डुडुल, हिंमत बावने व दिपक वानखडे यांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवप्रमाणपत्र देऊन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी सत्कार केला. तर डुडुल यांचा डॉ मोना चिमोटे, बावने यांचा डॉ वाडेगावकर, वानखडे यांचा डॉ सुजाता काळे यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ विद्या शर्मा म्हणाल्या, आयुष्यात दोन महत्वाचे क्षण असतात. एक म्हणजे आपण नोकरीवर लागतो तो आणि दुसरा सेवानिवृत्तीचा. कर्मचा-यांनी नाविण्यपूर्ण जीवन जगावे असा मोलाचा सल्ला देऊन त्यांनी सत्कारमूर्तींच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.
याप्रसंगी सत्कारमूर्ती एस व्ही डुडुल, हिंमत बावने व दिपक वानखडे यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नियंत्रण अधिकारी डॉ अनिल काळबांडे, अजय देशमुख यांनीही मनोगतातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष मंगेश वरखेडे व सचिव श्रीकांत तायडे तसेच पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला.राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी, तर आभार जनसंपर्क विभागातील सुनिल महल्ले यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.