अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागात डॉ राहुल लोधा यांचा निरोप समारंभ संपन्न
विद्यावारिधि पुरस्काराप्राप्त डॉ राहुल लोधा यांचा सत्कार
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधील संस्कृत विभागामधील व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक डॉ संयोगिता देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यापीठ अधिसभा सदस्य उज्ज्वल बजाज, संस्स्कृतभारतीचे प्रांत प्रचारप्रमुख देवदत्त कुलकणी, संस्कृतभारती जनपद संयोजक उल्हास बपोरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संस्कृत विभागातील डॉ राहुल लोधा यांना दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा ‘विद्यावारीधी’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना कुलसचिव तुषार देशमुख यांनी प्रशासनाचे संस्कृत विभागाला नेहमीच सहकार्य आहे असे सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दलही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी देवदत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यावारिधि डॉ राहुल लोधा यांच्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर उल्हास बपोरीकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृतभारतीच्या कार्याची ओळख करून दिली. उज्ज्वल बजाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती डॉ राहुल लोधा यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवेशीतांपैकी डॉ राजीव मुलमुले, डॉ सुरेश चिकटे, लुम्बिनी वाणी, प्रियंका निंगुळकर, प्रा स्वप्ना यावले, प्रा मोरेश्वर वेखंडे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ संयोगिता देशमुख यांनी द्वितीय वर्ष पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विभागातील उपलब्धी व उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.
प्रास्ताविक व अहवाल वाचन प्रा श्वेता बडगुजर, मान्यवरांचा परिचय प्रा प्रियंका मोहोड यांनी करून दिला. अमृता कोरडे, मयुरी अरमळ यांनी स्वागतगीत व संस्कृत गीत सादर केले. सूत्रसंचालन अथर्व जोशी, तर प्रा स्वप्ना यावले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.