मिल्लिया महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिर संपन्न
सर्वांनी नियमित नेत्र तपासणी करावी – डॉ हमीद अली
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जेंडर सेंसीटायझेशन सेल यांच्या वतीने दिनांक 06 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी जेंडर नुट्रिशन अँड हेल्थ सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत डोळे तपासणी शिबिराचे (आय चेकअप कॅम्प) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नेत्ररोग तज्ञ डॉ हमीद अली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस, प्रोफेसर सय्यदा सीमा हाश्मी, डॉ फारूक सौदागर, डॉ शोएब पीरजादे, डॉ सय्यद तनवीर यांची उपस्थिती होती.


प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ हमीद अली यांनी सांगितले की आपले डोळे एक जटिल संवेदी अवयव आहेत आणि आपली दृष्टी ही आपल्याजवळ असलेल्या सर्वात मौल्यवान संपत्तींपैकी एक आहे. डोळ्यांमुळेच आपण आपला परिसर पाहू शकतो आणि अनुभवू शकतो. तथापि, कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांच्या विकारामुळे मोठी गैरसोय होऊ शकते. आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात.आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे.
डोळ्यांचे विकार अनेक प्रकारचे आहेत ज्यामुळे एखाद्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांच्या स्थितीचे लवकर निदान होण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल तसेच नवीन तंत्रज्ञानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या नेत्र शिबिरात 45 विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद तसेच कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात आली यापैकी 21 जणांना नवीन डोळ्यांचे क्रमांक आढळले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस यांनी नवीन तंत्रज्ञानाने नेत्र समस्यांचे योग्य निदान होत असून, आपण सर्वांनी आपल्या डोळ्याचे आरोग्य उत्तम ठेवणे ही काळाची गरज आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक प्रा शोएब पीरजादे यानी तर आभार प्रोफेसर सय्यदा सीमा हाश्मी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ मोहम्मद इलियास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.