श्री बंकटस्वामी महाविद्यालयात नेत्रदान व अवयवदान जनजागृती शिबिर संपन्न

“प्रकाश आणि जीवन देणारा संकल्प”

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बीड शासकीय रुग्णालयातील नेत्रदान सल्लागार सी एस गुरव या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे होते.

Eye and organ donation awareness camp held at Shri Bankat swami College

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सी एस गुरव यांनी नेत्रदान व अवयवदानाचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “नेत्रदानामुळे दृष्टिहीन व्यक्तींना पुन्हा प्रकाश मिळतो, तर अवयवदानामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळू शकते. भारतात लाखो लोक अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असतात, मात्र अवयवदात्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यांनी यापुढे स्पष्ट केले की, मृत्यूनंतर डोळे, मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड यांसारखे अवयव दान करून अनेक लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. “एका नेत्रदानामुळे दोन जणांना दृष्टी मिळू शकते, तर अवयवदानामुळे आठ ते दहा जणांचे प्राण वाचू शकतात,” असे त्यांनी नमूद केले.

Advertisement

समाजासाठी प्रेरणादायी पाऊल

या वेळी समाजासाठी प्रेरणादायी पाऊल उचलत प्राध्यापिका छाया सोंडगे यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान फॉर्म भरून शासकीय रुग्णालयाकडे देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व गैरसमजुती दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विविध प्रश्न विचारून सखोल माहिती मिळवली. “अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता आहे,” असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे नेत्रदान व अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश पसरवण्यास मदत होणार आहे. “मृत्यूनंतरही आपले अवयव कुणाला तरी जीवनदान देऊ शकतात, ही भावना रुजवण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.

या जनजागृती शिबिरास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page